सेनगाव-जिंतूर रोड रुंदीकरण रखडले; अपघातांचे प्रमाण वाढले
— दर्पण प्रतिनिधी पांडुरंग होडबे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव-जिंतूर मार्गाचे रुंदीकरण काम सेनगाव ते लिंबाळा दरम्यान पूर्ण झाले असले, तरी लिंबाळा ते येलदरी हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने पुढील काम रखडले आहे. वन विभागाकडून परवानगी व इतर प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण थांबले असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) रस्त्याच्या साइड पट्टे भरण्याचे काम सुरू असले, तरी मुरूमाऐवजी मोठ्या प्रमाणात दगड-गोटे टाकले जात असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत असून, अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून, रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनते. नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून वन विभाग व PWD यांच्यात समन्वय साधत रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा मार्ग सेनगाव, येलदरी तसेच जिंतूर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, रस्ता अरुंद व खराब अवस्थेत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

No comments:
Post a Comment