वाढत्या उकाड्यामुळे जळगाव आरटीओ कार्यालयाच्या वेळेत तात्पुरता बदल
प्रतिनिधी : फजल शेख.
जिल्ह्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट कायम असून तापमानात मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय व आरोग्याचा धोका टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कार्यालयीन वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरटीओ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता कार्यालयाचे कामकाज सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. विशेषतः वाहन परवाना, लायसन्स चाचणी, नूतनीकरण आणि इतर सेवांसाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास कमी व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी आपल्या नियोजित अपॉइंटमेंट नव्या वेळेनुसार घ्याव्यात तसेच आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, “उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर कार्यालयाची वेळ पूर्ववत करण्यात येईल.”

No comments:
Post a Comment