'म्हसळा तालुका शांतताप्रिय; ईद सणानिमित्त शांतता समिती सभा संपन्न'.
(वैभव कळस )
श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा म्हसळा पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हसळा पोलीस ठाण्यात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले. ईद सण उत्साहपूर्ण, आनंदी व शांततेत साजरा व्हावा तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ही सभा घेण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी म्हसळा तालुका हा शांतताप्रिय असून येथे सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगितले. धार्मिक तेढ निर्माण करणारे अथवा सोशल मीडियावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह संदेश याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच सण-उत्सवांच्या काळात अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी बकरी ईद सणाचा आनंद साजरा करताना कुरबाणीच्या वेळी परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच आंतरराज्यीय फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याची सूचनाही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी म्हसळ्यात एका सुशिक्षित तरुण उद्योजकाची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपींना पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिताफीने अटक केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.
शांतता समिती सभेत माजी सभापती महादेव पाटील तसेच मुस्लिम समाजाचे सचिव मुब्बशिर जमादार यांनी चर्चेत सहभाग घेत म्हसळा पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.
सभेला जीप सदस्य अनिल बसवत,माजी नगराध्यक्ष अनिकेत पानसरे,सुनिल शेडगे, मुस्लिम समाज अध्यक्ष महमद पेणकर,श्री समीर घराडे, फारुख पेणकर, हिंदु समाज सचिव सुशील यादव,बाबू शिर्के,हेमंत नाक्की, निलेश मांदाडकर, शाहीद ऊकये,कौस्तुभ करडे,सोहेब हळदे आदी मान्यवर विविध धर्मीय समाजबांधव, शांतता समिती सदस्य,व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment