कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी

 



 नाफेड व एन.सी.सी.एफ मार्फत कांद्याची आश्वासित खरेदी किंमत वाढली

प्रतिनिधी  : . गणेश ठाकरे लासलगाव 

लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रब्बी कांदा २०२६ साठी किमान आश्वासित खरेदी किंमत जाहीर केली आहे. दिनांक २६ मे २०२६ पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर लागू राहणार असल्याचे आदेश केंद्र सरकारच्या कॉस्टिंग सेलमार्फत जारी करण्यात आले आहेत.

      कृषी भवन, नवी दिल्ली येथून २५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन पत्रानुसार हा दर रब्बी कांदा खरेदीसाठी लागू करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नाफेड आणि एन.सी.सी.एफ या संस्थांमार्फत केली जाणार असल्याची माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेला हा दर देखील उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, सध्या कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो २० ते २५ रुपये इतका पोहोचला असून मजुरी, वाहतूक, औषधे, खतांचे वाढलेले दर आणि हवामानातील बदल यामुळे खर्च सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत १,५८० रुपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचे मत व्यक्त होत आहे. लासलगाव बाजार समिती परिसरात मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरवाढीसाठी आंदोलने सुरू होती. बाजारात अनेक ठिकाणी कांद्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. विविध अहवालांनुसार महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चाखाली गेल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून कांदा खरेदीसाठी ‘प्राइस स्टॅबिलायझेशन फंड’ अंतर्गत हस्तक्षेप वाढविण्यात आला असला तरी प्रत्यक्ष खरेदीचे प्रमाण अत्यल्प असल्याची टीका देखील होत आहे. केंद्र सरकारने यापूर्वी कांदा बफर स्टॉक वाढवून बाजार नियंत्रणाचा प्रयत्न केला होता. शेतकरी संघटनांनी मात्र “उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव” निश्चित करण्याची मागणी पुन्हा जोर धरली आहे. कांद्याला किमान २,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.

केंद्राने जाहीर केलेला प्रतिक्विंटल १,५८० रुपयांचा कांदा दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असला, तरी तो उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपुरा आहे. आज कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो २० ते २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि तो सतत वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव निश्चित करणे ही काळाची गरज आहे.- जयदत्त होळकरसंचालक, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती


No comments:

Post a Comment