अवकाळी पावसाने भुईमूग उत्पादक शेतकरी संकटात



सेनगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी सुरू असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या उघडझाप पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास या बदलत्या वातावरणामुळे हिरावला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

शेतात उपटून ठेवलेले भुईमूग सततच्या ओलाव्यामुळे वाळत नसून शेंगांना बुरशी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता घसरत असून आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे गुरांसाठी वर्षभर उपयोगी पडणारा भुईमूग काड पूर्णपणे काळा पडत असून तो जनावरांना खाण्यास अयोग्य होत चालला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी काढणी करून पिके शेतातच ठेवली होती. मात्र अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मजुरी, बियाणे, औषधे व सिंचनावर केलेला खर्चही वसूल होणार की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाने पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


No comments:

Post a Comment