आबिटकर नॉलेज सिटी, पाल येथील शैक्षणिक संकुलात मुलींना सायकल वाटप..



भोगावती खोरा प्रतिनिधी 

शिक्षणाच्या वाटेला गती, मुलींच्या स्वप्नांना नवी भरारी,७० गावांतील ५०० विद्यार्थिनींच्या आयुष्यात आज आशेची नवी पहाट उगवली!

“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे…” असे म्हणणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला परिवर्तनाची सर्वात मोठी ताकद मानले. आज त्या विचारांची छोटीशी का होईना, पण कृतीतून जपणूक करण्याचा प्रयत्न करता आला, याचे मनापासून समाधान वाटत आहे.

गावोगावी, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या अनेक मुली आजही शिक्षणासाठी रोज अनेक किलोमीटर पायपीट करतात. उन्हाची तिरीप असो, पावसाची सर असो किंवा रस्त्यांची गैरसोय पण त्यांच्या डोळ्यांतील शिकण्याची जिद्द मात्र कधी कमी होत नाही. कित्येक वेळा या अशा अडचणींमुळे पालक मुलींना पुढे शिकवण्याचे टाळतात आणि काही स्वप्ने शाळेच्या रस्त्यातच थांबतात. 

ही अडचण थोडीफार कमी व्हावी, मुलींचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आबिटकर नॉलेज सिटी, पाल येथील शैक्षणिक संकुलात ७० गावांतील तब्बल ५०० विद्यार्थिनींना सीएसआर फंडातून मोफत सायकलींचे वितरण केले. आज त्या सायकली हातात घेताना मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि पालकांच्या मनातील समाधान हे शब्दात मांडणे खरोखर कठीण आहे.

काही मुली सायकलला घट्ट धरून उभ्या होत्या, जणू त्यांच्या स्वप्नांनाच दोन चाके मिळाली होती. तर काही पालकांच्या चेहऱ्यावर एक समस्या दूर झाल्याचे समाधान होते. कारण त्यांच्या लेकीचा शिक्षणाचा प्रवास आता थोडा सोपा होणार होता. ही केवळ सायकल नाही, तर त्यांच्या शिक्षणाची गती आहे, त्यांच्या आत्मविश्वासाला मिळालेली नवी ताकद आहे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली एक छोटीशी साथ आहे. या सर्व मुलींनी खूप शिकावे, मोठे व्हावे, स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे आणि आपल्या कुटुंबासह देशाचे नाव उज्ज्वल करावे, हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.

या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर   सौ.अर्चना कल्याणराव निकम (सदस्य, जि.प.कोल्हापूर), श्री. विक्रमसिंह पाटील (सभापती, पं.स.भुदरगड), सौ. अरुणा प्रशांत देसाई (उपसभापती, पं.स.भुदरगड), श्री. मदनदादा देसाई (माजी सदस्य, पं.स. भुदरगड), श्री. बाबा नांदेकर (सदस्य नियोजन समिती), श्री. सुनिल किरुळकर (सदस्य, पं.स.भुदरगड), श्री. धनंजय लाड (सदस्य, पं.स.भुदरगड), सौ. कल्याणी युवराज फगरे (सदस्य, पं.स.भुदरगड), प्रा. दौलतराव जाधव (माजी संचालक, गोकुळ दुध संघ), श्री. विद्याधर परीट (तालुकाप्रमुख, युवा सेना, भुदरगड),विद्यार्थिनी (मुली) व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment