अनसिंगमधील गाव तलाव प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
नारायण सातव अनसिंग, प्रतिनिधी :- (ता. ६ )
येथील प्रभाग क्रमांक ३ मधील गाव तलावाची दुरवस्था झाली असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर कचरा, मृत प्राणी टाकले जात असून मासळी बाजारातील घाणही बिनदिक्कतपणे तलावाच्या काठावर फेकली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे.
या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, मळमळ, त्वचारोग अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, वृद्ध व महिला यांच्या आरोग्यावर विशेष परिणाम होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते यश सतीश चव्हाण यांनी बुधवारी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन सादर केले. तलावाची तात्काळ स्वच्छता करावी, मृत जनावरे व कचरा हटवावा आणि भविष्यात घाण टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तलाव परिसर कायमस्वरूपी स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, असेही निवेदनात नमूद आहे.
*तलावाचे ऐतिहासिक महत्त्वही धोक्यात*
स्थानिकांच्या मते, तलाव स्वच्छ झाल्यास मोकाट जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व महिलांना कपडे धुण्याची सोय होईल. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी तलावाच्या पाळूचे खोदकाम करताना पुरातन मूर्तींचे अवशेष सापडले होते. त्यावेळी पुरातत्त्व विभागानेही येथे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती.
सध्या मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन प्रभावी पावले उचलावीत, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे. तलावाचे संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मतही व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, असा इशारा देण्यात आला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment