नांदागावात शॉर्टसर्किटमुळे शेतातील शेड जळून खाक; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली
प्रतिनिधी सोयगाव.. दिलीप मोरे...
सोयगाव तालुक्यातील नांदागाव परिसरात मंगळवार (दि. ५ मे २०२६) रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागून शेतातील पत्र्याचे शेड पूर्णतः जळून खाक झाले. शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत लाईनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशींना आगीचे तीव्र चटके बसून त्यांच्या अंगावरील चामडे निघाले आहे. तसेच आग विझवण्याच्या प्रयत्नात काही ग्रामस्थांच्या हाताला भाजल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.
या आगीत शेतकरी मिराबाई पांडुरंग बागुल (गट क्र. ८६, नांदागाव शिवार) यांचे अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेडमध्ये ठेवलेले सुमारे १२० सिंचन पाईप, दोन एकर क्षेत्रातील ठिबक सिंचन संच, २५ स्प्रिंकलर, ट्रॅक्टरसाठी वापरले जाणारे झटका मशीन, पेरणी यंत्र, जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी तसेच इतर शेती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीची तीव्रता इतकी होती की काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गाव शेजारीच असल्याने सतर्क ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जनावरे सोडवली व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या घटनेमुळे महावितरणच्या निष्काळजी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतातून जाणाऱ्या AG DTC LT विद्युत लाईनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून पूर्वीही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
“विद्युत यंत्रणेतील हलगर्जीपणा आणि वेळोवेळी देखभाल न केल्यामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असताना संबंधित विभाग मात्र केवळ कागदी कारभारात गुंतलेला दिसतो,” असा संताप सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला.
घटनेनंतर महसूल विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच महावितरणने तत्काळ लाईनची सखोल तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या घटनेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला असून, प्रशासनाच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment