बनावट सोन्याच्या दागिन्यांनी १५ लाखांची फसवणूक



२३ मे २०२६. (वैभव कळस )

;आंतरराज्यीय टोळी रायगड पोलिसांच्या जाळ्यात,म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल '.-

तालुका शहरात नामांकित व्यापाऱ्याला बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून  तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाणे गुन्हा रजी. क्रमांक ७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२),३१८(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच श्रीवर्धन विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्ने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाई पथकात सपोनि रविंद्र पारखे,पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी सुमित खोत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे,पोहवा सचिन शेलार,पोशि सागर चितारे,शौकत मुल्ला,विवेक ठाकरे आणि अक्षय पुरी यांचा समावेश होता.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केसाराम सावजी बागरी वय ४७,मोहनलाल गंगाराम परमार वय ४२,राजू शिलाराम राठोड वय २७,अनिल हरिराम परमार वय २६ आणि जितेंद्रकुमार मोहनलाल परमार वय २७ यांचा समावेश असून हे सर्व मूळचे राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांपैकी काही आरोपी सध्या रोहा तालुक्यात वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास आढळून आलेला नाही.

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार,दिनांक १५ मे २०२६ रोजी आरोपी क्रमांक १ व २ यांनी फिर्यादी यांना कमी दरात खरे सोन्याचे दागिने विक्रीस असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून १५ लाख रुपये घेऊन बनावट दागिने देण्यात आले.पैसे घेतल्यानंतर आरोपी पसार झाले.फिर्यादींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक १ ते ५ यांनी संगनमताने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.आरोपी क्रमांक ३,४ व ५ यांनी मुख्य आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी किल्ला,ता. रोहा येथून आरोपींना ताब्यात घेत दिनांक २२ मे २०२६ रोजी रात्री अटक केली.


सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नागरिकांना पोलीस प्रशासनाने फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.रस्त्यात किंवा घराजवळ कोणी अनोळखी व्यक्ती स्वस्त दरात सोने विकण्याचे आमिष दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.सोने खरेदी करताना नेहमी अधिकृत व नामांकित ज्वेलर्सकडूनच खरेदी करावी.फसवणूक झाल्यास बदनामीच्या भीतीने गप्प न बसता तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी.तक्रारदाराची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कोणतीही फसवणूक झाल्यास डायल ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच घरमालकांनी भाडेकरूंना घर देण्यापूर्वी त्यांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.“सतर्क रहा,सुरक्षित रहा,”असा संदेश जनसंपर्क अधिकारी,पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांनी नागरिकांना दिला आहे.

म्हसळा पोलिसांनी या प्रकरणी शिताफीने तपास करून आरोपींना रायगड पोलिसांचे मदतीने गजाआड केल्याने म्हसळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



No comments:

Post a Comment