“उर्दू शाळा क्रमांक १३ च्या स्थलांतराला तीव्र विरोध; एकता संघटनेचा इशारा – ‘शिक्षणाच्या हक्कावर घाला सहन केला जाणार नाही’”



जळगाव | प्रतिनिधी मोहम्मद फजल शेख 

जळगाव महानगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक १३ च्या स्थलांतराच्या प्रस्तावाला आता तीव्र विरोध सुरू झाला आहे. हा विषय केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून गरीब, मजूर आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काची लढाई बनला आहे. एकता संघटनेने महापौर, आयुक्त आणि शिक्षण विभागासमोर जोरदार भूमिका मांडत महाराष्ट्र शासनाच्या १५ मे २०२६ च्या शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन शाळा स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.

एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी सांगितले की शासन निर्णय क्रमांक ३३२१ नुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीत किंवा अधिक चांगल्या सुविधांसाठीच शाळेच्या स्थलांतरास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र उर्दू शाळा क्रमांक १३ बाबत अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात नाही. मग हा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संघटनेच्या माहितीनुसार या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी परिसरातील आहेत. शिवाजीनगरमधील ४३, शिवाजीनगर हुडकोमधील ५८, अमन कॉलनीतील ५, अस्मानिया मोहम्मदिया येथील १३ आणि मुघल गार्डनमधील ३२ असे एकूण १५१ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळेचे स्थलांतर झाल्यास या गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

२२ मे रोजी महापौर दीपमाला काळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकता संघटना, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी कागदपत्रांसह आपली बाजू मांडली. बैठकीत शाळेवर हिरवा रंग लावल्याचा आरोप करण्यात आला. मात्र संघटनेने स्पष्ट केले की इमारतीवर कुठेही हिरवा रंग नाही.

टेरसवर लोखंडी बार लावणे आणि मंदिर परिसराशी संबंधित मुद्द्यांवरही संघटनेने स्पष्टीकरण देत सांगितले की नव्याने बांधलेला चौथरा सुमारे २५ ते ३० फूट उंच असून विद्यार्थ्यांना तेथे पोहोचणे शक्य नाही. तसेच शाळा आणि मंदिर परिसरादरम्यान मजबूत भिंत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौरांनी विद्यार्थ्यांच्या डब्यांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला असता संघटनेने सांगितले की शाळेत पोषण आहार दिला जात असल्याने विद्यार्थी डबे आणत नाहीत. त्यामुळे हा आरोपही निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीनंतर महापौरांनी संबंधित नगरसेवक, शिक्षण अधिकारी, शालेय समिती, मुख्याध्यापक आणि एकता संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन हा विषय महासभेत मांडण्याचे आश्वासन दिले.

आचारसंहितेचा हवाला देत महापौरांनी निवेदन स्वीकारताना छायाचित्र काढण्यास नकार दिला. हे निवेदन उपायुक्त धनश्री शिंदे आणि प्रशासनिक अधिकारी शिक्षण मंडळ यांना सादर करण्यात आले.

महानगरपालिकेत आपला आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि एकता संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

एकता संघटनेच्या शिष्टमंडळात फारुक शेख यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक शोएब खाटीक, हाफिज रहीम पटेल, ॲड. अवेज शेख, मौलाना गुफरान, मौलाना इम्रान काकर, मतीन पटेल, मजहर खान, अनवर शिकलगार, आरिफ देशमुख, ताहेर शेख, युसुफ शहा, अल्ताफ शेख, साहिल शेख आणि जोहेद शेख यांचा समावेश होता.

शिक्षण हा आमचा हक्क आहे, उपकार नाहीत… सरकारी उर्दू शाळा वाचवा, मुलांचे भविष्य वाचवा!”— फारुक शेख, एकता संघटना, जळगाव



No comments:

Post a Comment