म्हसळा दिघी नाक्यावर भीषण आग, मुख्याधिकारी राठोड आणि नगरसेवक कर्णिक यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.-
२३ मे २०२६. (वैभव कळस )
आज दिनांक २३ मे रोजी सकाळी आठ च्या सुमारास म्हसळा दिघी नाक्यावरील पोलीस चौकी च्या मागील बाजूस पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या आवारात भीषण आग लागली. सुदैवाने पावसाचे उभाट असल्यामुळे प्रखर ऊन नव्हते त्यामुळे आगीचे डोंब भडकले नव्हते. वेळीच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आणि नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय कर्णिक यांना हि बाब समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अग्निशमन गाडीला पाचारण करून आग त्वरित विझविण्यात यश मिळविले. हि वेळ रात्रीची असती तर फार मोठी दुर्घटना घडली असती, आगीच्या स्थळा लागत विहान हॉटेल, सायबर कॅफे आणि बरीचशी दुकानें होती ती क्षणात भस्मसात झाली असती आणि फार मोठा अनर्थ घडण्यास वेळ लागला नसता.
आगीचे नक्की कारण जरी समजले नसले तरी पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात घाण आणि प्रचंड अडगल साचलेली आहे, त्याच प्रमाणे या आवारातील गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पायऱ्यांवर अनेक टवाळ गँग बसलेली असते आणि दिवसभर सिगारेट वगैरे ओढण्याचे प्रकार दिवसरात्र सुरु असतात. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होते, हे आवार म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशी अवस्था आहे.
आग आटोक्यात आल्यानंतर त्वरित नगरसेवक संजय कर्णिक आणि मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी या कार्यालयाच्या आवाराची स्वच्छता नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांकडून करून घेतली. आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली. नगरसेवक कर्णिक हे नेहमीच तत्पर असतात आणि शहरात कोणतीही समस्या निर्माण होवो ते तत्परतेने हजर होतात आणि प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.

No comments:
Post a Comment