कळमनुरीतील डंपिंग ग्राऊंड व पाणीपुरवठा यंत्रणेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड (कचरा डेपो) तसेच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. डंपिंग ग्राऊंडला भेट देताना त्यांनी कचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती, स्वच्छता उपाययोजना, कचऱ्याचे वर्गीकरण व त्याची विल्हेवाट प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेतला, परिसरात स्वच्छता राखण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचरा डेपोची नियमित व योग्य देखभाल करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पंपगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी यंत्रणेची कार्यस्थिती, पाण्याचा दाब, पुरवठा व वितरण व्यवस्था यांची माहिती घेतली. नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा यासाठी यंत्रणा सक्षम ठेवावी तसेच उद्भवणाऱ्या अडचणी तत्काळ दूर कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीदरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment