मेंढ्या चारण्याच्या कारणावरून वकीलास मारहाण; एकावर लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल



प्रतिनिधी  :-  लासलगाव दि. ५

     खोडशाळपणे मेंढपाळास मेंढ्या वकीलाच्या शेतात चार असे सांगणाऱ्या बांध भाऊबंदास जाब विचारण्यास गेलेल्या वकीलास मारहाण झाल्याचा प्रकार दहेगाव शिवारात घडला.

 याबाबत निफाड न्यायालयातील वकील गणेश प्रल्हाद नागरे यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, दि.४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजेचा सुमारास दहेगाव भरवस शिवारातील शिव रस्त्यावरून मेंढ्या जात असताना फिर्यादी गणेश नागरे यांच्या शेताजवळून मेंढ्या जात असताना आरोपी सागर वाल्मिक नागरे, रा.डोंगरगाव हा तेथे आला. आरोपीने मेंढ्या चारणाऱ्या अज्ञात इसमास फिर्यादी यांच्या शेतात मेंढ्या चारण्यास सांगितल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. यावरून फिर्यादी आरोपीस समजावण्यासाठी गेले असता आरोपीने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. 

जवळील शेतातील दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर मारून दुखापत केली. तसेच रस्त्यावर पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली. वाद सोडविण्यास आलेल्या फिर्यादी यांच्या भावजय जयश्री खंडू नागरे व भाऊ खंडू नागरे यांनाही आरोपीने शिवीगाळ करून धमकी दिली की, 'पोलीस स्टेशनला मी काहीही जुमानत नाही, माझ्या नादी लागलात तर एखाद्या दिवशी कायमचे संपवून टाकीन.' अशी धमकी दिली, असे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) ३५१(३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स. पो. नि. दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शरद बागल पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment