जीवनाचे खरे सार्थक आई वडीलांची सेवा; खांबेवाडीत पुण्यतिथीनिमित्त आदर्श मातांचा सन्मान




करमाळा प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे

करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथे आदर्श माता अयोध्या विठ्ठल सुपनवर यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आदर्श मातांचा सन्मान करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात किर्तन, प्रवचन, भजन तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. धनंजय लोखंडे महाराज यांच्या हरिकीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर प्रभावी विवेचन करत दृष्टांतांच्या माध्यमातून जीवनमूल्ये पटवून दिली.

“आई-वडिलांच्या सेवेमध्येच जीवनाचे सार्थक आहे. प्रत्येक तरुणाने आई-वडिलांची सेवा करावी आणि त्यांचा कधीही अपमान करू नये,” असा संदेश लोखंडे महाराजांनी दिला. पुढे बोलताना त्यांनी, “आजच्या कलियुगात आई-वडील चार-पाच मुलांचा सांभाळ करतात; मात्र तीच मुले दोन आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे,” असेही स्पष्ट केले.

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात वाढत चाललेल्या वृद्धाश्रमांच्या पार्श्वभूमीवर समाज चुकीच्या दिशेने जात असल्याची खंत व्यक्त करत, “तरुणांनी आई-वडिलांना दैवत मानून त्यांची सेवा करावी,” असा हितोपदेश त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment