अवकाळी पावसाने बळीराजावर घाला; पिकांचे प्रचंड नुकसान — अजय बनकर

 


टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना) विष्णु मगर

देळेगव्हाण परिसरासह जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः कहर माजवत शेतकऱ्यांना मोठ्या संकटात ढकलले आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेल्या या अनपेक्षित पावसामुळे कांदा, गहू आणि मका या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभे पीक जमिनीवर आडवे पडले आहे. काढणीस तयार असलेला माल पूर्णतः भिजल्याने तो निकृष्ट ठरला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून बळीराजा आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला आहे.

या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय बनकर यांनी तहसीलदार अविनाश लोंढे साहेब व कृषी अधिकारी अमोल शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

 त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत तलाठी पठाण साहेब यांना संबंधित भागात त्वरित पाठवले असून प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली आहे. 

अजय बनकर यांनी ठाम शब्दांत मागणी केली की, जाफराबाद तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणी तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. ही प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून उत्पादन खर्चाच्या तुलनेत भरघोस नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला असून त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस आणि प्रभावी निर्णय घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

 



No comments:

Post a Comment