दारू विक्रीविरोधात महिलांचा संताप उफाळला
महागांवमध्ये देशी दारू दुकान व वाईन बार हटविण्याची जोरदार मागणी नगराध्यक्षांचा यास पाठिंबा
प्रतिनिधी महागाव अक्षय डोंगरे
महागांव शहरात सुरू असलेल्या देशी दारूच्या दुकानासह बैठक वाईन बारविरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून आला असून विशेषतः महिलांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रभाग क्रमांक १ मधील परिसरात सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात दारू विक्रीचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, देशी दारूचे दुकान आणि बैठक वाईन बार सुरू झाल्यापासून परिसरात वारंवार भांडणे, गोंधळ आणि अनुचित प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. सायंकाळ होताच मद्यधुंद व्यक्तींची गर्दी वाढत असल्याने महिलांना व विद्यार्थ्यांना ये-जा करताना असुरक्षित वाटत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शांततेला तडा जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्र येत दारू विक्रीविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. जयश्री संजय नरवाडे यांच्या पुढाकाराने अनेक महिलांनी एकत्र येत या प्रश्नावर आवाज उठवला असून शहरातील विविध भागांतील महिलाही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. “घराघरात कलह निर्माण करणारी दारू विक्री थांबली पाहिजे,” अशी भूमिका महिलांनी स्पष्ट केली आहे.
या आंदोलनाला महागांवच्या नगराध्यक्षा रंजना दीपक आडे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी दारू विक्रीविरोधात ठोस भूमिका घेतली असून शहराच्या सामाजिक आरोग्यास घातक आहे महिलांची सुरक्षितता, तरुण पिढीचे भविष्य आणि कुटुंबांचे स्थैर्य धोक्यात घालणाऱ्या या दारू विक्रीला महागांवमध्ये स्थान नसावे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, यापूर्वीही प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सह्या गोळा करून प्रशासनाकडे अधिकृत तक्रार सादर केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दखल घेत ७ तारखेला सह्यांची पडताळणी करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत नागरिकांच्या मागण्या ऐकून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. गरज पडल्यास महिलांचा मोर्चा काढून दारू दुकानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
नगराध्यक्ष रंजना आडे यांनी शहरातील सर्व महिलांना आणि नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “महागांव शहर दारूमुक्त व्हावे, कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या विक्रीला आळा बसावा यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन आता हळूहळू लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे. दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत असून देशी दारूचे दुकान आणि बैठक वाईन बार तात्काळ हटविण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.
महागांव शहरातील सामाजिक वातावरण, महिलांची सुरक्षितता आणि तरुण पिढीचे भविष्य या सर्व गोष्टींचा विचार करता प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.

No comments:
Post a Comment