युद्धाच्या पार्श्वभूमीवर महागांव तालुका प्रशासन सतर्क पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

 



प्रतिनिधी महागाव अक्षय डोंगरे 


महागांव : मध्यपूर्व आशिया, अमेरिका तसेच युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात इंधन पुरवठ्याबाबत विविध चर्चा आणि अफवा पसरत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यात कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये आणि नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनाने तत्परता दाखवत महत्त्वाची आढावा बैठक आयोजित केली.

तालुक्यात कार्यरत असलेल्या Bharat Petroleum Corporation Limited (BPCL), Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) आणि Indian Oil Corporation Limited (IOCL) या तीनही प्रमुख तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसह तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील इंधन साठा, पुरवठा व्यवस्था आणि संभाव्य अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीला तालुक्यातील एकूण १२ पेट्रोल पंपांचे संचालक व व्यवस्थापक उपस्थित होते.

 यावेळी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तालुक्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री प्रशासनाला दिली. सध्या इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून भविष्यातही नियमित पुरवठा कायम ठेवण्याबाबत कंपन्यांनी प्रशासनाला आश्वस्त केले.

दरम्यान, युद्ध परिस्थितीच्या नावाखाली काही ठिकाणी अफवा पसरवून पेट्रोल-डिझेल साठवण्याचे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.पंपांवर अनावश्यक गर्दी करणे, मोठ्या प्रमाणात इंधन साठवून ठेवणे किंवा अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाजगी ठिकाणी खुलेपणाने इंधन विक्री करण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी डब्यांमध्ये किंवा बेकायदेशीररीत्या इंधन विक्री करण्याचे प्रकार होत असल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

तसेच पेट्रोल पंप चालकांना इंधन वितरणात पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा आणि कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.तालुक्यातील नागरिकांना उद्देशून प्रशासनाने जाहीर आवाहन केले आहे की, महागांव तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित पुरवठा सुरू राहणार आहे. त्यामुळे घाबरून पंपांवर गर्दी करण्याची किंवा अनावश्यक साठवणूक करण्याची गरज नाही.

दरम्यान, इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. यासाठी श्री. एम. एम. कोल्हे, निरीक्षण अधिकारी, महागाव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यांचा संपर्क क्रमांक ८८३०३८०२६८ असा देण्यात आला आहे.

युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या सतर्कतेच्या उपाययोजनांमुळे महागांव तालुक्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी अफवांना बळी न पडता संयम आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment