भीषण पाणी टंचाई: निसर्गाचा इशारा की मानवाची घोडचूक..?
मार्च महिना संपत आला की उन्हाची चाहूल लागतेच; मात्र यंदाची परिस्थिती काही वेगळीच आणि अधिक गंभीर वाटू लागली आहे. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असून अंगाची लाही लाही होत आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने अजून बाकी असल्याने पुढील काळ किती कठीण असेल, याची कल्पनाच करवत नाही.आकाशात तळपणारा सूर्य जणू आग ओकत आहे. हिरवेगार डोंगर करपले आहेत, झाडाझुडपांची पानगळ होऊन परिसर ओसाड दिसू लागला आहे.
नद्या, विहिरी, तलाव, धरणे आणि इतर सर्व जलस्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. अनेक ठिकाणी नदीपात्रात केवळ वाळू आणि दगड उरले आहेत. विहिरींच्या तळाशी पाणी दिसेनासे झाले आहे. धरणांमध्ये साठा कमी झाल्याने पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
दिवसाढवळ्या अंगावर कोसळणाऱ्या उन्हामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे म्हणजे उष्माघाताचा धोका पत्करणेच होय.भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. पूर्वी जिथे ५० ते १०० फूटांवर पाणी मिळत होते, तिथे आता २०० ते ३०० फूट खोल बोअरवेल घ्यावी लागते; तरीही हमखास पाणी मिळेल, याची खात्री उरलेली नाही. या सगळ्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना आणि मुक्या जनावरांना बसतो आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी जनावरे, पक्षी आणि माणसेही त्रस्त झाली आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे, आणि त्या टँकरसाठीही नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते.
या संकटाला केवळ निसर्ग जबाबदार नाही; मानवी निष्काळजीपणाही तितकाच कारणीभूत आहे. झपाट्याने वाढणारे शहरीकरण, जंगलतोड, पावसाचे पाणी साठवण्याकडे होणारे दुर्लक्ष आणि अनियंत्रित पाणीवापर. या सर्व गोष्टींमुळे आजची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण निसर्गाच्या देणगीचा अतिवापर केला, पण त्याची परतफेड करण्याचा पुरेसा प्रयत्न केला नाही.
आजची परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रत्येकाने याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पाणी हेच जीवन आहे. बहुतांश भूभाग वाळवंटीकरणाच्या मार्गावर आहे. “हे कळते, पण वळत नाही” अशी आपली अवस्था झाली आहे. डोंगरमाथे पेटवून आपण उष्णतेत केवळ भर टाकत आहोत. येत्या काळात पाण्यासाठी संघर्ष निर्माण झाला, तर ते आश्चर्यकारक ठरणार नाही. त्यामुळे “पाणी वाचवा” ही केवळ घोषणा न राहता ती कृतीत उतरवणे गरजेचे आहे.
घराघरात पाणी वाचवण्यासाठी छोटे छोटे उपाय करता येतात. उदा. वाहते नळ बंद ठेवणे, अंघोळीसाठी बादलीचा वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे व त्यांची निगा राखणे, तसेच शेतीत ठिबक व फवारणी सिंचनाचा वापर करणे इत्यादी. सरकार, स्थानिक प्रशासन आणि समाज यांनी एकत्र येऊन जलसंवर्धनाचे प्रभावी उपाय राबवणे अत्यावश्यक आहे.जलसंधारण प्रकल्प, बंधारे आणि पाणलोट क्षेत्र विकास यांसारख्या उपक्रमांना चालना देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात केली, तरच या संकटावर मात करता येईल.
आज आपण पाणी जपले, तरच उद्याचा दिवस सुरक्षित राहील. अन्यथा “धरण पायथ्याला आणि कोरड घशाला” अशी वेळ सर्वांवर येऊ शकते. त्यामुळे "पाणी वाचवा, जीवन वाचवा" हीच खरी काळाची हाक आहे.
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी
(महाड - रायगड)

No comments:
Post a Comment