शिवाजीनगरात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता; रामनवमी निमित्त दिंडी व महाप्रसाद
वाळुंज (वाळुंज महानगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड
शिवाजीनगर, वाळुंज येथील श्रीराम मंदिर श्रद्धा कॉलनी येथे आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात उत्साहात सांगता करण्यात आली. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित या सप्ताहात परिसरात तीन दिवस भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
सप्ताहाच्या दरम्यान विविध कीर्तन, भजन, प्रवचन तसेच हरिपाठाच्या कार्यक्रमांनी भाविकांना अध्यात्मिक आनंद दिला. या धार्मिक सोहळ्यात अनेक कीर्तनकारांनी आपली सेवा अर्पण केली.
रामनवमीच्या पावन दिवशी सकाळी दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात निघालेल्या या दिंडीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.
या सप्ताहात गंगागिरी महाराज भजनी मंडळी यांनी आपले अमूल्य सहकार्य दिले. तसेच गायनाचार्य पांडुरंग महाराज बोरकर यांनी आपल्या सुरेल गायनातून कार्यक्रमाला उत्कृष्ट साथ देत भक्तिमय वातावरण अधिकच भारावून टाकले.
यावेळी हरिभक्त परायण सरगर महाराज, हरिभक्त परायण भरत जाधव महाराज तसेच हरिभक्त परायण चव्हाण महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सप्ताह कमिटीचे नारायण माने व संतोष ढोरे हेही यावेळी उपस्थित होते.
सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वर्षीही अशाच भक्तिमय वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस सप्ताह कमिटीने व्यक्त केला.

No comments:
Post a Comment