सोयगाव तालुक्यात बिबट्याची दहशत; निंभोरा शिवारात वनविभागाची पाहणी, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन



सोयगाव प्रतिनिधी..दिलीप मोरे...

सोयगाव तालुक्यातील निंभोरा शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी निंभोरा गावाचे माजी उपसरपंच भाऊसाहेब अहिरे यांना शेतात काम करत असताना सुमारे शंभर फुटांच्या अंतरावर बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी तत्काळ सोशल मीडियावर माहिती देत परिसरातील शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. तसेच वन विभागालाही याबाबत कळविण्यात आले होते.

दरम्यान, गुरुवारी पुन्हा एकदा सावकार महाजन यांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आणखी वाढले. त्यांनीही गावकऱ्यांना याची माहिती देत खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

या पार्श्वभूमीवर वन विभागाचे अधिकारी ए. पी. भालेराव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वन विभागातर्फे बिबट्याचा माग काढून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गोंदेगाव, निंभोरा, गलवाडा, खडकदेवळा, डोंगरगाव व वनगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment