२१ मार्चच्या आगीला ७ दिवस उलटले; ‘आम्ही येतो’च्या आश्वासनावरच एमएसईबी, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत
सावळदबारा शिवारातील शेतकऱ्याचे ३.५ लाखांचे नुकसान; सीईंना कात्रण पाठवूनही अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
प्रतिनिधी सोयगाव...दिलीप मोरे...
सावळदबारा शिवारातील गट क्रमांक १०८ मध्ये दिनांक २१ मार्च २०२६ रोजी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी दिनकर आबाराव मोरे यांचे सुमारे ३ ते ३.५ लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा एकही सक्षम अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेला नाही, त्यामुळे शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
सदर घटनेत दोन एकर मका, दोन एकर गहू पीक, दोन स्प्रिंकलर संच तसेच ठिबक सिंचन व्यवस्था आगीत जळून खाक झाली. घटनेच्या वेळी शेजारील गट क्रमांक १०६ मधील शेतकरी गजानन आप्पा कुल्ले हे त्यांच्या शेतात उपस्थित होते. त्यांनी विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने आग लागल्याचा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी तात्काळ इतर शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर गावातील ५० ते ६० नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग नियंत्रणात आणता आली नाही.
घटनेनंतर शेतकरी दिनकर मोरे यांनी विद्युत वितरण विभागाशी वारंवार संपर्क साधला. मात्र, दूरध्वनीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून “आम्ही येतो”, “आज येणार आहोत” अशी आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात एकही अधिकारी घटनास्थळी आलेला नाही, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सदर प्रकरणात शेतकरी दिनकर मोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच सीई कार्यालयाला वृत्तपत्रातील बातम्यांचे कात्रण पाठवून मदतीची मागणी केली आहे. तरीदेखील संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
या घटनेमुळे शेतकरी दिनकर मोरे हे नुकसान भरपाई व पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असून, एमएसईबी विभागाचा सक्षम अधिकारी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करावा व शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.

No comments:
Post a Comment