इंधन आहे कुठे? शेतकरी रात्रभर रांगेत



 मशागतीला खीळ, पिकांवर संकट अफवा म्हणत प्रशासन मोकळे; मग शेतकऱ्यांना डिझेल का नाही? – बाळू पाटील यांचा सवाल


प्रतिनिधी महागांव अक्षय डोंगरे 

महागांव तालुक्यात इंधनटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून, शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याने मशागतीची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांना इंधनासाठी रात्रभर पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत असून, तरीही पुरेसे डिझेल मिळत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

पेरणीपूर्व मशागत, फवारणी व इतर शेतीकामांसाठी डिझेल अत्यावश्यक असताना, त्याचाच तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक शेतकरी रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत पंपावर थांबूनही रिकाम्या हाताने परतत असल्याची तक्रार आहे. “इंधन आहे, पण आम्हाला मिळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, बी-बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमतीमुळे आधीच खर्चाचा भडका उडाला आहे. त्यात इंधनटंचाईमुळे मशागतीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीचा हंगाम हातातून निसटण्याची भीती आता प्रत्यक्षात उतरू लागली आहे.

यात भर म्हणून काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काढणीच्या तोंडावरच झालेले हे नुकसान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून इंधनटंचाईबाबत कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले जात आहे. तहसीलदार अभय मस्के यांनी “इंधन पुरवठा सुरळीत आहे, तुटवड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही,” असे स्पष्ट केले आहे. मात्र जमिनीवरील वास्तव पूर्णपणे वेगळे चित्र दाखवत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यावरून बाळू पाटील नरवाडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “जर इंधनाचा तुटवडा नाही, तर शेतकऱ्यांना डिझेल का मिळत नाही? रात्रभर रांगेत उभे राहणे ही कोणती व्यवस्था आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, “शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, महागाई आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे त्रस्त आहे. त्यात इंधनासाठी धावपळ करावी लागते, ही प्रशासनाची अपयशी व्यवस्था आहे. तातडीने इंधनपुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

महागांव तालुक्यातील परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. एकीकडे इंधनटंचाई, दुसरीकडे महागाई आणि त्यातच निसर्गाचा मार — या तिहेरी संकटात शेतकरी अडकला आहे.प्रशासन कागदोपत्री “सर्व काही सुरळीत” असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात शेतकरी त्रस्त आहे, हे वास्तव दुर्लक्षित करता येणार नाही.

आता केवळ स्पष्टीकरणे देऊन उपयोग नाही; प्रत्यक्षात इंधन उपलब्ध करून देणे, परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे हीच खरी प्रशासनाची परीक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा संताप उफाळून येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

No comments:

Post a Comment