महागांवात रामनवमी भक्तिभावाने साजरी; शहर दुमदुमले ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी

 


प्रतिनिधी महागांव अक्षय डोंगरे 

श्रीराम जन्मोत्सव समितीचे नियोजनबद्ध आयोजन; पूजा, पठण आणि नामस्मरणाने धार्मिक वातावरण

महागांव :भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरी होणारी रामनवमी महागाव शहरात यंदाही मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव समिती महागांव यांच्या पुढाकाराने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील राममंदिरांसह प्रमुख ठिकाणी सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला, अशी धार्मिक मान्यता आहे. भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांचे स्थान हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पवित्र दिनाचे औचित्य साधून महागाव शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

रामनवमीच्या निमित्ताने शहरातील विविध राममंदिरांमध्ये सकाळी अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. दुपारच्या सुमारास रामजन्माचा सोहळा पार पडताच “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अनेक भक्तांनी उपवास करून या दिवशी भगवान श्रीरामाच्या नामस्मरणात वेळ व्यतीत केला.

या दिवशी रामायण पठण, भजन-कीर्तन आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळांच्या वतीने हरिनाम सप्ताह, भजन कार्यक्रम आणि सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले. यामुळे शहरात दिवसभर धार्मिक उत्साहाचे वातावरण कायम राहिले.

रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता होत असल्याने या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. देवी उपासना आणि श्रीराम जन्मोत्सव यांचा संगम या दिवशी अनुभवायला मिळाला. मंदिर परिसरात आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि रोषणाई करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

श्रीराम जन्मोत्सव समिती महागाव यांनी या कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजन केले. स्वयंसेवकांनी व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत भक्तांना कोणतीही अडचण भासू दिली नाही.

रामनवमीसारखे सण केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून समाजातील एकोपा, संस्कार आणि नैतिक मूल्ये दृढ करण्याचे माध्यम आहेत. भगवान श्रीरामांचे आदर्श जीवन, कर्तव्यनिष्ठा आणि धर्मपालन यांचा संदेश आजच्या समाजालाही मार्गदर्शक ठरतो. अशा सणांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य वाढून सकारात्मक वातावरण निर्माण होणे ही काळाची गरज आहे.


No comments:

Post a Comment