निफाड हादरवणारी घटना ; २४ दिवस बेपत्ता महिलेचा खून उघड ; पोलिसांच्या धडाडीच्या तपासाने आरोपी जेरबंद
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
निफाड शहरात मानवी नात्यांना काळिमा फासणारी अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली असून, तीन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. थंड डोक्याने रचलेला हा क्रूर कट निफाड पोलिसांच्या तांत्रिक तपास, सतर्कता आणि चिकाटीमुळे उधळून लावत आरोपीला कायद्याच्या कचाट्यात ओढण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या धडाडीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निफाड येथील मामलेदार चौक परिसरात राहणाऱ्या रंभाबाई आनंदा काळे (वय ६०) या दिनांक २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. याबाबत त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण वाटणाऱ्या या घटनेमागे गंभीर गुन्हा दडलेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, विभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले. मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित अरुण बाजीराव ढेपले (वय ४५, व्यवसाय दूध विक्री) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कसून चौकशीसमोर त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. तपासात उघड झाले की, आरोपी आणि मयत महिलेचे मागील सुमारे १५ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. मयत महिला आरोपीकडे लग्न करण्याचा आग्रह धरत होती. या हट्टाला वैतागून आरोपीने कट रचल्याचे समोर आले आहे.
आरोपीने महिलेच्या पिण्याच्या पाण्यात भांग मिश्रित गोळ्या टाकून तिला गुंगी आणली. त्यानंतर निफाड शिवारातील उमाकांत अहिरराव यांच्या शेतातील जुन्या विहिरीजवळ नेऊन नायलॉन दोरीच्या साह्याने तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून त्यात दगड टाकून विहिरीत फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तसेच विहिरीत पोहण्याचे कौशल्य असलेल्या तरुणांच्या मदतीने शनिवारी रात्री दोन वाजल्यापासून शोधमोहीम सुरू केली. अखेर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खोल विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, गुन्हा उघडकीस आल्यानंतर संशयित अरुण ढेपले याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर निफाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पैशाच्या देवाण - घेवाणीच्या वादासह विवाहबाह्य संबंधातून हा खून झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या तपासात पोलीस कर्मचारी नितीन सांगळे, मनीषा गायकवाड, संगीता जाधव, धनंजय जाधव, अरविंद ढवळे, धनंजय बैरागी, विनोद जाधव, राजेंद्र दरोडे, सागर सानप, सुधाकर चव्हाणके यांनी मोलाची भूमिका बजावली.
निफाड पोलिसांनी अत्यंत संयम, तांत्रिक कौशल्य आणि वेगवान कारवाईच्या जोरावर गंभीर गुन्ह्याचा छडा लावला असून त्यांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून निफाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment