निफाड तालुका हादरला ; चार वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू, दोघे बेपत्ता - शोधमोहीमेमुळे पोलिसांची दमछाक
प्रतिनिधी. - गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यात दोनच दिवसात घडलेल्या चार वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण अद्याप बेपत्ता आहेत. पालखेड डावा कालवा, शेततळे व इतर ठिकाणी सुरू असलेल्या शोधमोहीमेमुळे निफाड पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकांची अक्षरशः दमछाक होत आहे. सलग घडलेल्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासन सतर्क झाले आहे.
रानवड येथील पवार कुटुंबावर मोठा आघात करणारी घटना रविवारी उघडकीस आली. पती - पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर दीपक पोपट पवार (वय २८) यांनी आपल्या तीन मुलांना केस कापण्याच्या कारणाने घराबाहेर नेले. काही तासांनी नांदुर्डी हद्दीतील पालखेड डाव्या कालव्यात दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. प्रसाद दीपक पवार (वय दीड वर्ष) व वीर दीपक पवार (वय पाच वर्षे) अशी मृत मुलांची नावे असून दीपक पवार व त्यांचा तिसरा मुलगा अविनाश हे अद्याप बेपत्ता आहेत. कालवा परिसरात शोधकार्य सुरू आहे.
नैताळे - बोकडदरे शिवारात पालखेड डावा कालवा परिसरात कपडे धुण्यास गेलेल्या ज्योती अनिल शेकरे (वय १८, रा. ओबीधोंड ता. पेठ) हिचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर २३ मार्च रोजी तिचा मृतदेह डोंगरगाव परिसरात आढळून आला.
तिसऱ्या घटनेत देवपूर शिवारातील विठोबा दादा शिरसाठ यांच्या शेतातील शेततळ्यात अंदाजे १६ ते १७ वर्षे वयाच्या अनोळखी मुलीचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने तिला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चौथ्या घटनेत निफाड शहरातील बेपत्ता ६० वर्षीय महिलेचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्याने युवकाने तिला गुंगीचे औषध देऊन हत्या केली व मृतदेह पोत्यात टाकून विहिरीत फेकला. तब्बल २४ दिवसांच्या तपासानंतर निफाड पोलिसांनी हा खून उघडकीस आणत आरोपीला ताब्यात घेतले.
ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, विभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण व मोबाईल कॉल डिटेलच्या आधारे तपास केला. पोलीस कर्मचारी नितीन सांगळे, मनीषा गायकवाड, संगीता जाधव, धनंजय जाधव, अरविंद ढवळे, धनंजय बैरागी, विनोद जाधव, राजेंद्र दरोडे, सागर सानप व सुधाकर चव्हाणके यांनीही मोलाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे निफाड परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

No comments:
Post a Comment