प्रामाणिक सेवेमुळे नागरिकांच्या तक्रारी आपोआप कमी होतात : सीईओ विवेक गायकवाड
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळा आज दि.२४ मार्च रोजी हिंगोली येथे उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अनेक ग्रामसेवकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सीईओ विवेक गायकवाड म्हणाले की, ग्रामसेवकांना त्यांच्या कामाची पावती म्हणून हा पुरस्कार दिला जात असून याचा आनंद आहे. गाव पातळीवर प्रामाणिक व वेळेत सेवा दिल्यास नागरिकांच्या तक्रारी आपोआप कमी होतात, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायत स्तरावर काम करताना लोकांना समाधान मिळेल अशा पद्धतीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपशिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी "वंदे मातरम" गीताच्या १५० वर्षांनिमित्त २३ मार्चपासून ग्रामपंचायत, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट व आंतरविभागीय समन्वय पोर्टल विकसित करण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात बचत गटांच्या माध्यमातून हळदीचे उत्पादन "पिवळे सोन" म्हणून विकसित होत असल्याचाही उल्लेख यावेळी
करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव गडापोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत क्षीरसागर व दत्ता वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment