वाळूजमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी
वाळूज दैनिक दर्पन प्रति.वाळूज महानगर पांडुरंग गायकवाड
(ता. गंगापूर) येथे रमजान ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. वाळूज येथील दर्गा परिसरात मुस्लिम बांधवांनी सकाळी लवकर एकत्र येत ईदची नमाज अदा केली. या प्रसंगी परिसरात आनंद, बंधुता आणि एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.
नमाज पठणानंतर सर्व समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. धर्म, जात-पात यापलीकडे जाऊन सर्वांनी एकोप्याचा संदेश दिला, ज्यामुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.
सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पांडुरंग शेळके, बिट आमलदार किरण जाधव भिमराव शेळके तसेच इतर पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात होते.
एकंदरीत, वाळूजमध्ये रमजान ईदचा सण आनंद, शांतता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत उत्साहात साजरा झाला.

No comments:
Post a Comment