कळमनुरीतील उपजिल्हा रुग्णालयातील बांधकामावर बोगस कामाचा आरोप; वंचित बहुजन आघाडीची लेखी तक्रार
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरू असलेल्या बांधकाम कामांवर निष्कृष्ट दर्जाचे व बोगस काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी युवक वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सध्या रुग्णालय परिसरात वॉल कंपाऊंडसह विविध बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहेत. मात्र वॉल कंपाऊंडच्या कामात नवीन लोखंडासोबत जुने व गंजलेले लोखंड मिसळून काम करण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे असून शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केल्यानंतर संबंधित विभागाकडे लेखी तक्रार देऊन काम तात्काळ थांबविण्याची
मागणी केली आहे, तसेच या कामाची इस्टिमेटनुसार योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत आहे का, याची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच कामावर देखरेख करणाऱ्या निगराणी अभियंत्यावरही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत
सदरील काम बंद ठेवावे तसेच कोणतीही बिले अदा करू नयेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची २४ तासांच्या आत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही युवक वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment