संघर्षातून घडलेली न्यायाची वाटचाल : जिद्द, प्रामाणिकपणा आणि न्यायासाठी झटणारी शिरवाडेची कन्या अ‍ॅड.सुनीता चिताळकर



प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव 

    आज सहज व्हॉट्सअप स्टेटस पाहत असताना एक फोटो नजरेस पडला. जागतिक महिला दिनानिमित्त न्यायाधीश एन. ए. पटेल यांच्या हस्ते नाशिक येथील सरकारी वकील अ‍ॅड. सुनिता चिताळकर यांचा सत्कार होत असल्याचा तो फोटो होता. तो फोटो पाहताच मनात एक विचार आला, संघर्षातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या या शिरवाडे गावच्या कन्येवर आजच्या महिला दिनानिमित्त काहीतरी लिहायलाच हवे.

      आज नाशिक जिल्हा न्यायालयात शिरवाडे गावची पहिली महिला व प्रामाणिक सरकारी वकील म्हणून नाव कमावलेली शिरवाडे गावची कन्या अ‍ॅड. सुनिता चिताळकर. सत्य, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुनिता..... जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर न्यायव्यवस्थेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सुनिता चिताळकर.

   सुनीताचा स्वभाव खूप तापट..कुणावरही अन्याय झाला तर ती पेटून उठते.. विशेषतः महिलांवर होणारे अत्याचार तिला सहन होत नाही... एकदा की केस तिच्याकडे गेली तर आरोपीला सजा ही ठरलेली.. ग्रामीण भागातील मुलीला एवढी ताकद कुठून आली असेल..? मागोवा घेतला तर हे बाळकडू तिला तिच्या वडिलांकडून अर्थात शंकरनांना यांचेकडून मिळाले आहे.. 

        ग्रामीण भागातील एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलगी सुनिता. शिक्षण घेत असताना फारशा सोयी सुविधा नसतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर आज ती नाशिक जिल्ह्यात प्रख्यात सरकारी वकील बनली आहे. सुनिता चिताळकर यांचे बालपण ग्रामीण भागात व साध्या कुटुंबात गेले. शेतकरी कुटुंब असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. वेळप्रसंगी शेतात काम करून कुटुंबाला हातभार लावणे आणि तरीही शिक्षणाची जिद्द कायम ठेवणे असा त्यांचा प्राथमिक संघर्षमय प्रवास होता.

        इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, धामोरी येथे पूर्ण केले. त्यानंतर लासलगाव येथील नूतन महाविद्यालय येथे पॉलिटिकल सायन्स विषयात पदवी शिक्षण घेतले. पुढे नाशिक येथील एन.बी.टी. लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. कायद्याचे शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींमुळे काही काळ शिक्षण थांबवावे लागले; मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केले आणि आपले स्वप्न पूर्ण केले.

      सन २००६ पासून नाशिक जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. मेहनत, अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिकपणामुळे न्यायालयीन क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. सन २०१३ मध्ये त्यांची शासकीय वकील म्हणून नियुक्ती झाली. पेठ, सुरगाणा, हरसूल आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील न्यायालयांमध्ये शासनाच्यावतीने त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये प्रभावी बाजू मांडली आहे.

आजपर्यंत १५० पेक्षा अधिक खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये प्रभावी युक्तिवाद करत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे. गाजलेल्या प्रकरणांमध्ये २०१६ मधील छबू नागरे बनावट नोट प्रकरण तसेच २०१४ मधील पिंपळगाव येथील गणेश को - ऑपरेटिव्ह बँक फसवणूक प्रकरण यामध्ये शासनाच्या वतीने भक्कम बाजू मांडली होती. नोकरी करत असताना त्यांना आर्थिक आमिष दाखवण्यात आले, तर कधी या कामाच्या दरम्यान अनेक वेळा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या. मात्र त्याला न घाबरता त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे न्यायासाठी लढा सुरू ठेवला.

या यशामागे त्यांचे वडील शंकर नाना यांचे संस्कार आणि त्याग हा मोठा आधार आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. शब्दशः पोटाला चिमटा काढून मुलांना शिकवले. ते नेहमी शाळेत येऊन शिक्षकांशी चर्चा करत, मुलांच्या अभ्यासाची चौकशी करत. मुलांनी शिक्षणात मागे जाऊ नये यासाठी त्यांची तळमळ कायम असायची.

त्यांच्या त्या त्यागाचे वर्णन करणाऱ्या ओळी आजही मनाला स्पर्शून जातात, 'शिक्षण देतांना त्यांनी चार घास कमी खाल्ले, पण मूल अभ्यासात मागे जाऊ नये या विचाराने मन ढवळून निघाले.'  आज नाशिकसारख्या शहरात प्रामाणिक सरकारी वकील म्हणून काम करत असलेल्या सुनिता चिताळकर या केवळ आपल्या कुटुंबाचा नाही तर शिरवाडे गावाचा अभिमान आहेत. संघर्षातून उभे राहून समाजासाठी काम करणाऱ्या अशा महिलांच्या कर्तृत्वाला जागतिक महिला दिनानिमित्त मनापासून सलाम.🙏

No comments:

Post a Comment