पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण बंद करा स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी पुढाकार घ्या-हभप सोपान महाराज कनेरकर लासलगावी हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद



 प्रतिनिधी | गणेश ठाकरे, लासलगाव 

पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण ने बंद करा, आपले नवीन वर्ष जानेवारीला नव्हे तर गुढीपाडव्याला साजरे करा तरुणाईने याचा गांभीर्याने विचार करून स्वतःची संस्कृती आणि सभ्यता जपण्याचा काम करावे, स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्रख्यात प्रबोधनकार ह भ प सोपान महाराज कनेरकर यांनी केले.

     लासलगाव शहरात मंगळवारी सायंकाळी लासलगाव बाजार समितीच्या आवारात हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रख्यात प्रबोधनकार हभप सोपान महाराज कनेरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रांत प्रचारक‌ केदार कुलकर्णी उपस्थित होते.

        कनेरकर महाराज यांनी आपल्या प्रबोधनामध्ये तुम्ही कसे जगले यापेक्षा किती लोकांसाठी जगले हे महत्त्वाचे आहे तर तुम्ही किती लोकांना जेवू घातले यापेक्षा तुम्ही लोकांना काय जेवू घातले हे महत्त्वाचे असल्याचे सांगत तुम्हाला किती मुले आहेत हे महत्त्वाचे नसून तुमचे मुले किती नैतिकतेच्या मार्गावर आहेत हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर धर्माचे लोक त्यांचे सण वेगळ्या पद्धतीने साजरे करतात, पण गणपती नवरात्र आणि रामनवमीला आपण धांगडधिंगा करून मिरवणूक काढतो हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन संस्कृतीचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. 

      नफरत नही, हम प्रेम की पुजारी है... गर्व से कहो हम हिंदुत्ववादी है हे सांगत आपल्या स्वतःच्या राष्ट्राचा आपल्याला अभिमान बाळगता आला पाहिजे, देशात जन्मलेल्या प्रत्येक पुत्राला हिंदुस्तानी असल्याचा गर्व असावा. आजकालची तरुणाई सोशल मीडियाच्या युगात नको त्या गोष्टीकडे वाहत चालली आहे, प्रेम व्यक्त करण्यासाठी आता विशिष्ट दिवसांची गरज पडत आहे, कधी असतो टेडी डे, तर कधी असतो रोझ डे, मात्र ज्या माय बापाच्या जीवावर मारली मजा त्यांना करा प्रपोज, मग मात्र तुमच्या आयुष्याचा रोझ झाल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

    सहप्रांत प्रचारक‌ केदार कुलकर्णी यांनी प्रबोधन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज शंभर वर्ष पूर्ण झाली असल्याचे सांगत इतर देशांमध्ये संस्कृती संपलेली आहे, कुटुंब भावना शून्य झालेली आहे, देश नावाची अभिमानाची गोष्ट तिथे शिल्लक राहिलेली नाही, राष्ट्र नावाची संकल्पना नाही, संस्कृती नावाची वस्तुस्थिती नाही, त्या गोष्टी आपल्याकडे थोपवण्याचे काम केलं जातंय, आधुनिकतेच्या नावाखाली आपण परंपरा विसरत चाललो आहे याचा गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला तरुणाईला यावेळी त्यांनी दिला. भारत म्हणून संस्कृती, आदर्श परंपरा, एकत्रित कुटुंब पद्धती ही जपण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     प्रास्ताविकातून प्रा अश्विनी पवार यांनी हिंदू संमेलन आयोजनाची संकल्पना विशद केली.कनेरकर महाराज यांचा सन्मान शहीद जवान यांचे आई-वडील उत्तम ढोमसे, हिराबाई ढोमसे तसेच रोहिणी ढोमसे यांच्या हस्ते करण्यात आला. तर केदार कुलकर्णी यांचा सन्मान शहीद जवान यांचे आई वडील गोपाळा गोरडे व जनाबाई गोरडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर देवढे यांनी केले तर कार्यक्रमाला जनार्दन स्वामी आश्रमाचे बहुरूपी महाराज , गणपत बाबा नागरे ,चेतन महाराज महानुभाव ,शाम महाराज गांगुर्डे ,विक्रम महाराज काळे यांच्यासह सकल हिंदू समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         झाकलेले नेहमी सुरक्षित राहते.. काळजी घ्या..

आपण लाख,दीड लाख रुपयांचे मोबाईल वापरतो मात्र मोबाईल घेतल्यावर तो कायमस्वरूपी सुरक्षित राहावा म्हणून त्याला कव्हर लावतो. म्हणजे आपण त्याला सुरक्षित झाकतो. अगदी तसंच जीवन जगताना मुलींनी देखील आपल्या शरीराला पुरेसा झाकता येईल इतके कपडे व्यवस्थित घातले पाहिजे याची काळजी कुटुंबातील स्त्रियांनी घेतली पाहिजे. अंग पूर्ण झाकले की मग वाईट प्रकार घडण्यास एक प्रकारे आळा बसतो. त्यामुळे झाकलेले नेहमी सुरक्षित राहते या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन महिला तसेच युवतींना कनेरकर महाराजांनी आपल्या प्रबोधनातून दिले.

No comments:

Post a Comment