विश्वाच्या पटलावर झेपावणारी अभिजात मराठी...
दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी भारत सरकारने मराठी भाषेला “अभिजात भाषा” म्हणून दर्जा बहाल केला. हा सन्मान केवळ भाषेचा नसून मराठी संस्कृतीचा, इतिहासाचा आणि विचारपरंपरेचा गौरव आहे. मायमराठीची हजारो वर्षांची परंपरा, समृद्ध साहित्यसंपदा आणि स्वतंत्र भाषिक वैशिष्ट्ये यांची दखल घेऊन हा मान देण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी हा क्षण अभिमानाचा आणि आत्मभान जागवणारा आहे.
२७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित या थोर साहित्यिकांने आपल्या लेखणीने मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेले. त्यांच्या साहित्यनिर्मितीला मानवंदना म्हणून हा दिवस साजरा करणे म्हणजे मराठी साहित्याच्या वैभवाला वंदन करणे होय.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही; ती आपल्या अस्मितेची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या अभंगवाणीतून अध्यात्माचा अमृतस्रोत वाहतो; शाहिरी परंपरेतून शौर्य आणि स्वाभिमान जागतो; तर आधुनिक साहित्यिकांच्या लेखणीतून सामाजिक परिवर्तनाची मशाल प्रज्वलित होते. मराठी भाषेने असंख्य पिढ्यांची मानसिक, भावनिक, वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण घडवली आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व नाकारता येणार नाही. व्यापार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय संवाद यासाठी इंग्रजी आवश्यक आहेच. परंतु मातृभाषेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या मुळांपासून दूर जाणे होय. कागदाची किंवा प्लास्टिकची कृत्रिम फुले कितीही आकर्षक दिसली तरी ती गंधहीन असतात. त्यात जिवंतपणा नसतो. ही कृत्रिम फुले भ्रमरांना आकर्षित करू शकत नाहीत. परकीय भाषा शिकण्याला विरोध नाही पण परभाषेचा स्वीकार करताना मायमराठीचा विसर पडू नये असे माझे प्रांजळ मत आहे. इंग्रजी भाषा मावशी असू शकते; पण मराठी ही आई आहे. मावशी आईची जागा घेऊ शकत नाही. आईचे ममत्व, माया, शिकवण आणि संस्कार कोणत्याही पर्यायाने मिळू शकत नाहीत. मराठी आपला श्वास आहे, अस्मिता आहे. मराठी आपला बाणा आहे. आपलं अस्तित्व आहे.
अभिजात दर्जा मिळणे हा शेवट नाही; ती नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. आणि म्हणूनच घरात, शाळेत, कार्यालयात मराठीचा अभिमानाने वापर करूया.मुलांना मराठी वाचनाची सवय लावूया.सामाजिक माध्यमांवर शुद्ध, समृद्ध मराठी लिहूया. मराठी साहित्य, नाटक, कविता, चित्रपट यांना प्रोत्साहन देऊया.मराठी ही केवळ एका राज्याची भाषा नाही; ती विचारांची, संस्कारांची आणि संस्कृतीची विश्वव्यापी परंपरा आहे. तिच्या अभिजाततेचा लौकिक जागतिक पातळीवर नेणे, मराठीला विश्वभाषेचा मान मिळवून देणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
या मराठी भाषा गौरव दिनी एकच संकल्प करूया..
“मायमराठीचा अभिमान बाळगू, तिचा सन्मान राखू आणि आपल्या मायमराठीला विश्वभाषेचा लौकिक प्राप्त करून देऊया ही माझी, तुमची आणि तमाम मराठीजनांची जबाबदारी आहे..! --- प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी (महाड-रायगड)

No comments:
Post a Comment