“उत्पत्तीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत… मराठी भाषेचा प्रेरणादायी प्रवास” – तहसीलदार चंद्रकांत शेळके
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक अस्मिता आणि तंत्रयुगातील नव्या संधींचा वेध
प्रतिनिधि सोयगाव...दिलीप मोरे..
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तहसीलदार चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके यांनी मराठी भाषेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आधुनिक प्रवासावर प्रकाश टाकत भाषेच्या जतन-संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दिन हा केवळ भाषेचा उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान व्यक्त करणारा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषेची मुळे प्राचीन संस्कृतपर्यंत पोहोचतात. संस्कृतपासून प्राकृत, पुढे महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश या टप्प्यांतून मराठीचा विकास झाला. यादवकालीन शिलालेखांपासून मराठीला स्वतंत्र ओळख मिळू लागली, असे त्यांनी स्पष्ट केले.
संत परंपरेने मराठीला जनभाषा बनवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांच्या अभंग-ओव्यांतून समाजप्रबोधन घडले. ‘अमृतातेही पैजा जिंके…’ या ओवीचा उल्लेख करत त्यांनी भाषेच्या माधुर्याची जाणीव करून दिली.
साहित्य क्षेत्रात लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय जाणीव जागवली, तर वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर आणि कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले. त्यांच्या साहित्यकृतींनी समाजमन घडवले आणि आधुनिकतेचा स्पर्श दिला.
मराठीच्या खानदेशी, मालवणी, वऱ्हाडी यांसारख्या बोलीभाषा तिच्या समृद्धतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकगीते, पोवाडे, लावणी, तमाशा यांसारख्या लोककला प्रकारांतून मराठी संस्कृती जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी नियमित मराठी वाचनाची सवय लावावी, मराठी वर्तमानपत्रे वाचावीत, निबंध लेखन व वाचनालयाचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा उल्लेख करत सातत्यपूर्ण प्रयत्नांतून भाषेची श्रीमंती वाढते, असे ते म्हणाले.
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, भाषांतर साधने आणि सामाजिक माध्यमांमुळे मराठी भाषेला जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाशी मराठीला जोडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा गौरव दिन हा आपल्या भाषिक वारशाचे जतन करण्याची प्रेरणा देणारा दिवस असून मराठीचा गौरव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गौरव असल्याचे तहसीलदार शेळके यांनी शेवटी नमूद केले.

No comments:
Post a Comment