राजस्थानी समाजाच्या ‘अनसिंग चंग महोत्सवा’ची उत्साहात सांगता
फागण महोत्सवात पारंपरिक चंग-नृत्य व होळी गीतांनी वातावरण झाले आनंदमय
अनसिंग :- नारायण सातव (ता .२ ) :- येथील राजस्थानी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘अनसिंग चंग महोत्सवा’ची मोठ्या उत्साहात येथील बालाजी मंदिरात ( ता.१ ) मंगळवारी सांगता झाली. फागण महिन्याच्या निमित्ताने साजऱ्या करण्यात येणाऱ्या या महोत्सवात राजस्थानी लोकसंस्कृतीचे रंगतदार दर्शन घडले.या महोत्सवात राजस्थानी समाज चंग मंडळाच्या कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत चंग वाजवत फागणची पारंपरिक गीते सादर केली. चंग मंडळ प्रमुख बबलू बजाज व समस्त सदस्यांनी केलेल्या या कार्यक्रमांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली. होळीच्या रंगात रंगलेली लोकगीते, भक्तिगीते तसेच सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसर आनंदोत्सवात न्हाऊन निघाला होता.चंगच्या तालावर युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे नृत्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, यंदा युवक पिढीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभल्याने महोत्सवाला वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली. आधुनिक जीवनशैलीत पारंपरिक लोककला लुप्त होत असताना, युवकांनी पुढाकार घेऊन राजस्थानी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला.फागण महोत्सवाच्या निमित्ताने होळीच्या पारंपरिक गीतांतून सामाजिक प्रेम, बंधुता व आपुलकीचा संदेश देण्यात आला. रंग, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवत समाजातील सर्व घटक एकत्र आले.कार्यक्रमाच्या सांगते प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत पारंपरिक चंग परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. आयोजकांनी समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.या उत्सवामुळे राजस्थानी समाजातील एकोप्याची भावना अधिक दृढ झाली असून पुढील वर्षीही हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

No comments:
Post a Comment