गावगाडा भाग १२३ होळी
*गणेश ठाकरे लासलगाव
होळी हा ग्रामीण भागातील अती महत्वाचा व अतिउत्साहाने साजरा होणारा सण आहे. ग्रामीण भागात दांडी पौर्णिमेला मंदिरासमोर विधिवत दांडा रोवला जातो. त्यांनतर गावातील मुले गावातील वाळलेली झाडे, गोवऱ्या आणून होळीवर रचत असतात. बऱ्याच वेळा मुले गावातील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सरपणही चोरून आणत त्यात खूप मजा वाटायची. होळीत दुःख दारिद्र्य जळून खाक होते अशी जुन्या जाणत्या गावकऱ्यांची भावना आहे. होळीच्या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होरी (उत्तर भारत), होळी, शिमगा (महाराष्ट्र), शिग्मा, शिग्मो (कोकण, गोमंतक) ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. देशी नाममालेत हेमचंद्राने ह्या लोकोत्सवाला ‘सुगिम्हअ’ (सुग्रीष्मक) असे म्हटले आहे. सुगिम्हअ वरून शिग्मा हा शब्द आला आणि वर्णविपर्यासाने त्याला 'शिमगा' हे नाव पडले. ते महाराष्ट्रात रूढ आहे. याशिवाय ह्या उत्सवाला हुताशनी महोत्सव आणि दोलायात्रा, कामदहन अशीही नावे आहेत. शालिवाहन शकाच्या मास गणनेप्रमाणे शेवटचा महिना जो फाल्गुन, त्यात फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा उत्सव करावा, असे म्हटले जाते. फाल्गुन शुक्ल नवमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो, असे ऋग्वेदी ह्यांनी त्यांच्या आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास ह्या ग्रंथात नमूद केला आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो, अशी ह्या सणाची एक उत्पत्ती दिली जाते. काहींच्या मते होलीका, ढूंढा, पूतना ह्यांसारख्या लहान मुलांना घातक ठरणाऱ्या राक्षसिणींशी ह्या उत्सवाचा संबंध आहे. कृष्णाचा वध करायला आलेल्या पूतनेचे उदाहरण प्रसिद्ध आहे. होळी ही एका मुद्दाम खणलेल्या खड्ड्यात गवत, लाकूड, गोवऱ्या पेटवून केली जाते. पूतनेला स्वतः कृष्णाने ठार मारले तथापी होलाका, ढूंढा ह्या राक्षसिणींचे दहन केल्याच्या पुराणोक्त कथा आहेत. मदनाचे शिवाने दहन केल्याच्या कथेशीही होळीच्या उत्सवाचा संबंध जोडण्यात येतो.
होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन ‘ढूंढा राक्षसिणीच्या पिडेचा परिहार व्हावा, म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो’, असा संकल्प प्रकट करावा. नंतर होलिकेची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी. नंतर बोंबा ठोकाव्यात.
ह्या सणाच्या संदर्भात भविष्यपुराणात ढूंढा राक्षसिणीची कथा आलेली आहे. ही राक्षसीण गावात शिरून मुलांना त्रास देत होती. गावकऱ्यांनी तिला घाणेरड्या शिव्या देऊन मोठा अग्नी पेटवला आणि तिला पळवून लावले. होळीच्या उत्सवात बोंबा मारून अश्लील शब्द उच्चारतात, ह्याचे मूळ ह्या कथेत सापडते. माघी पौर्णिमा म्हणजे उत्सवाआधी एक महिना गावाच्या मध्यभागी एरंडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्तमेढ रोवतात. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोवऱ्या, पेंढा इ. जमा करावयास आरंभ होतो. हे सर्व जळाऊ साहित्य चोरून आणायचे असते. होळी जळून गेल्यानंतर दुधा-तुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केली जाते. होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. होळीच्या पाठोपाठ धूळवड आणि रंगपंचमी येते. रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्यांनी रंग फेकला जातो.
वेगवेगळ्या राज्यांत होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. बंगालमध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला उत्सव सुरू होतो. त्याला दोलायात्रा म्हणतात. घरचा यजमान त्या दिवशी उपास करतो. सकाळी कृष्णाची आणि सायंकाळी अग्नीची पूजा तो करतो. नंतर उत्सवासाठी आलेल्या लोकांवर फल्गू (गुलाल) उधळतात. घराबाहेर एक गवताची मनुष्याकृती तयार केलेली असते. ती जाळतात. ओडिशात कृष्णमूर्ती पालखीतून मिरवीत नेतात. घराघरातले लोक बाहेर येऊन कृष्णमूर्तीला अत्तर लावतात आणि गुलाल उधळतात. महाराष्ट्रात सामान्यतः फाल्गुनी पौर्णिमेला होळी पेटवली जाते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य करतात. दुसऱ्या दिवशी होळीवर तापवलेल्या पाण्याने स्नान केले जाते. गोव्यात होळीच्या उत्सवात बीभत्सपणा फारसा नसतो. लोक नाचतात, गातात. होळीसाठी एक १५ ते २० हात उंचीचा वृक्ष पाडून ठेवलेला असतो. होळीच्या रात्री ढोलकी वाजवीत लोक वृक्षाकडे जातात. त्याची पूजा करून त्याच्या फांद्या तोडतात. मग तो सोट खांद्यावर घेऊन देवळाकडे जातात. तेथे होळीसाठी खड्डा खणून ठेवलेला असतो. त्यात तो सोट उभा करून आंब्याच्या पालवीने सजवितात. त्याच्या डोक्यावर एक असोला नारळ ठेवतात. होळीला हळदकुंकू वाहतात. नारळ फोडतात. ह्या वेळीमात्र बोंबा मारून अश्लील शब्द बोलतात. होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन होय. होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्या सणामागे एक आख्यायिका आहे. पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंहरूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते.
दहन करताना 'होळी रे होळी पुरणाची पोळी...' अशी घोषणाबाजी केली जाते.

No comments:
Post a Comment