वार्षिक स्नेहसंमेलन मोहोत "उत्साह २०२५-२६" जल्लोषात संपन्न
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
मोहोत येथील प्रतिष्ठित मराठी शाळा रा.जि.प. उच्च प्राथमिक आदर्श शाळा, मोहोत यांचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उत्साह २०२५–२६’ शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी ६ वाजता शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा बहारदार आविष्कार आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य मा. श्री. मनोज भाऊ काळीजकर (महाड) यांनी भूषविले. तसेच माजी पंचायत समिती सभापती मा. सौ. सपनाताई सुभाष मालुसरे, पंचायत समिती सदस्या मा. सौ. नूतनताई गोपाळशेठ मोरे (महाड), बिरवाडी बिटाचे बिट विस्तार अधिकारी तथा मोहोत केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा. श्री. सुधीर सकपाळ साहेब आणि मोहोत गावचे सरपंच मा. श्री. संदीपदादा गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने शुभारंभ-
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बालाजी पारटवाड यांनी वार्षिक अहवाल सादर करत वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला.
सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार
यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीवर आधारित ‘कोळी’ नृत्य ठरले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘पाणी वाचवा’ या विषयावरील नाटक तसेच छोट्या गटातील विद्यार्थ्यांची मराठी गीते प्रेक्षकांच्या मनाला भिडली.
याशिवाय कोळी नृत्य, लावणी, मराठी, हिंदी, वेस्टर्न व साऊथ डान्स अशा विविध रंगतदार सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमला.
गुणवंतांचा गौरव-
शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. आपल्या मनोगतात मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत कलागुणांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
ऐतिहासिक नाटिकेने सांगता
कार्यक्रमाच्या अखेरीस धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नाटिकेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र गावडे सर यांनी मांडले. ‘वंदे मातरम्’ने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत मोरे, उपाध्यक्षा सौ. पुजाताई पवार, मोहोत गाव कमिटी अध्यक्ष मा. सुधीरभाऊ पवार, श्री. महेंद्रभाऊ मोरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. बालाजी पारटवाड, शिक्षकवृंद व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या आठवणीत कायमचा कोरला जाईल असा हा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.

No comments:
Post a Comment