आंबेगावच्या ‘बालउद्योजक उद्याचा उद्योजक घडवूया या नवोपक्रमाचा राज्यात प्रथम क्रमांक…
प्रतिनिधी / श्री. गणेश ठाकरे लासलगाव
राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (SCERT), पुणे यांच्या वतीने आयोजित सन 2025-26 च्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबेगाव येथील उपक्रमशील उपशिक्षक जयंत निवृत्तीनाथ कापसे यांनी राबविलेल्या "बाल उद्योजक" या अनोख्या उपक्रमाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
“बालउद्योजक… उद्याचा उद्योजक घडवूया” या नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव, आर्थिक साक्षरता, नियोजन व नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून व्यवसायाची प्राथमिक माहिती देत आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यात या उपक्रमाला यश आले. राज्यभरातून सुमारे 1200 ते 1500 नवोपक्रम या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. जिल्हास्तर व विभागस्तरावर काटेकोर छाननी आणि परीक्षण झाल्यानंतर निवडक उपक्रम राज्यस्तरावर पाठविण्यात आले. त्यापैकी केवळ 70 उत्कृष्ट नवोपक्रमांची अंतिम निवड करण्यात आली. अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष सादरीकरणानंतर प्रथम क्रमांकाचा मान आंबेगाव शाळेला मिळाला.
या नवोपक्रमाच्या स्पर्धेची सुरुवात सन 2016 पासून झाली असली तरी आजपर्यंत नाशिक जिल्ह्याला राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळाली नव्हती. ही संधी येवला तालुक्यातील आंबेगाव शाळेला मिळाली आणि प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या यशाबद्दल नाशिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रंजना लोहकरे, येवला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी श्रीमती मनिषा वाकचौरे, केंद्रप्रमुख राजेंद्र कुशारे तसेच शिक्षकवृंद, पालक व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.
यावेळी “हे यश संपूर्ण शाळेचे, माझ्या विद्यार्थ्यांचे आणि सहकाऱ्यांचे आहे,” अशी भावना कापसे यांनी व्यक्त केली. याकामी त्यांना त्यांच्या सहकारी श्रीमती सविता कुशारे तसेच विद्यार्थ्यांची मोलाची साथ लाभली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे आंबेगाव शाळेचे आणि नाशिक जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे.
असा होता 'बालउद्योजक' नवोपक्रम:
विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयापासूनच व्यावसायिक दृष्टीकोन आणि स्वावलंबन निर्माण व्हावे, या उद्देशाने आंबेगाव शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले गेले. यात प्रामुख्याने नैसर्गिक कुंकू, पर्यावरणपूरक साबण, मेणबत्ती, आयुर्वेदिक केसतैल, खडू आणि मशरूम लागवड यांसारख्या विविध उत्पादनांचा समावेश होता. केवळ उत्पादनच नव्हे, तर स्थानिक तेल घाणा, ढेप उद्योग व पैठणी क्लस्टरला भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि आर्थिक नियोजनाचे धडे देण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या वस्तु शाळेच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या आनंद मेळाव्यामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

No comments:
Post a Comment