राज्यातील पहिली करमुक्त हिंदू - मुस्लिम - बौद्ध ऐक्याचे प्रतीक पीरसाई बाबा यात्रोत्सवाचे आयोजन
प्रतिनिधी :-गणेश ठाकरे लासलगाव
येथील हिंदू - मुस्लिम - बौद्ध धर्मीय ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीरसाई बाबांचा यात्रोत्सव दि. ११ ते दि. १४ मार्च दरम्यान होणार आहे. सर्वधर्मीय एकोप्याचे दर्शन घडविणारी ही यात्रा परिसरात विशेष आकर्षण ठरते.
हिंदू - मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन, तमाशा कलावंतांची कलापूर्ण मिरवणूक व हजेरी हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. पीरसाई बाबा हे हिंदूंचे की मुस्लिमांचे दैवत असा वाद न घालता सर्व धर्मीय ग्रामस्थ एकोप्याने यात्रोत्सव साजरा करतात. पीरसाई बाबा ग्रामदैवत तसेच सर्व जाती - धर्मीयांचे श्रद्धास्थान असून मंदिराची देखभाल व पूजा - अर्चा मुस्लिम समाजाकडे आहे. सन १९६५-६६ च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री तल्यारखान यांनी शिरवाडे गावास भेट देऊन येथे असलेल्या सर्वधर्मीय ऐक्याचे कौतुक केले होते.
या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संदलच्या दिवशी गावातील प्रत्येक घरी नवीन गव्हाचे पीठ, गूळ व तूप यापासून “मलिदा” तयार केला जातो आणि तो प्रसाद म्हणून पीरसाई बाबांना अर्पण केला जातो. निफाड तालुक्यात नैताळे पाठोपाठ मोठी भरणारी ही यात्रा असून पूर्वी येथे टांगा शर्यती होत असत. कालौघात त्या बंद झाल्या असल्या तरी खेळणी विक्रेते, रहाट व मिठाई विक्रेते मोठ्या प्रमाणावर यात्रेत सहभागी होतात. ही यात्रा पूर्णपणे करमुक्त असून ग्रामपंचायत दुकानदारांकडून कोणताही कर आकारत नाही. यात्रेनिमित्त बाहेरगावी असलेले नागरिक व चाकरमानी गावी येतात. पूर्वी यात्रेत पशुबळी देण्याची प्रथा होती. मात्र ग्रामस्थ व मुंबई येथील बौद्धाचार्य काशिनाथ धनराव यांच्या पुढाकाराने तसेच दलित ग्रामस्थांच्या सामंजस्याने ही प्रथा बंद करण्यात आली आहे. नागरिकांचा व विक्रेत्यांचा वाढता प्रतिसाद पाहता पूर्वी तीन दिवस चालणारी यात्रा आता चार दिवस भरविण्यात येत आहे.
यात्रोत्सवानिमित्त शुक्रवार दि. ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता नवरदेव हळद लावणे व घटी बसणे कार्यक्रम झाला असून रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत पोपटराव कदम सह वाघे मंडळ, निळखेडे यांचे जागरण, शनिवार दि. ७ मार्च रोजी रात्री मच्छिंद्र भाऊ जगताप सह वाघे मंडळ, उजनी यांचे जागरण, रविवार दि. ८ मार्च रोजी खंडू भगत सह वाघे मंडळ, मुखेड तर सोमवार दि. ९ मार्च रोजी भाऊसाहेब कांगणे सह वाघे मंडळ, देवगाव फाटा यांचे जागरण, मंगळवार दि. १० मार्च रोजी किसन चव्हाण सह वाघे मंडळ, मुखेड यांचे जागरण आयोजित करण्यात आले आहे.
बुधवार दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान संदल मिरवणूक काढण्यात येणार असून यात भागवत ब्रास बँड, मुखेड हे मुख्य आकर्षण असेल. त्यानंतर रात्री ९ वाजता पीरसाई बाबांची महापूजा होईल. गुरुवार दि. १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता काठी मिरवणूक, सायंकाळी ५.३० वाजता बारा गाड्या ओढणे हा कार्यक्रम होणार असून नवरदेव म्हणून विकास फुलचंद पवार सहभागी होणार आहेत. याच दिवशी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत पोपट कदम सह वाघे मंडळ, निळखेडे यांचे लंगरी जागरण होईल. शुक्रवार दि. १३ मार्च रोजी रात्री ९ ते १२ वाजेदरम्यान सविता राणी पुणेकर सह लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा लोकनाट्य तमाशा रंगणार आहे. शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत तमाशा कलावंतांची हजेरी होऊन यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
तरी या यात्रोत्सवास परिसरातील भाविक, दुकानदार तसेच तमाशा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ व यात्रोत्सव समिती यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment