ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीला नवे बळ; ग्रंथालयांचे डिजिटल रूपांतरण काळाची गरज - संचालक अशोक गाडेकर



प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव 

 समाजात वाचनाची आवड वाढवून ज्ञानसमृद्ध आणि विचारशील पिढी घडवण्यासाठी ग्रंथालय चळवळीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. ग्रंथालयांचे डिजिटल रूपांतरण करून मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाखो पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नाशिक आणि श्री माणकेश्वर वाचनालय, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नाशिक ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

     ग्रंथोत्सवाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात आली. माणकेश्वर वाचनालय येथून ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीत विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेतून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.ग्रंथोत्सवात विविध प्रकाशनांच्या नऊ पुस्तक विक्री स्टॉल्स लावण्यात आले असून ग्रंथप्रेमी व वाचकांना विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

  यावेळी सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, कवी लक्ष्मण महाडिक, निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कांताबाई कर्डिले, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोखळे, प्राचार्य एस. एन. शिंदे, माणकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, उपाध्यक्ष मेघा जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.

गाडेकर म्हणाले की, राज्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाने डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तयार करण्यात आलेल्या ग्रंथालय ॲपच्या माध्यमातून आता वाचकांना घरबसल्या मोबाईलवरून पुस्तक, लेखक, विषय किंवा प्रकाशक यांची माहिती सहज मिळणार आहे. राज्यातील शासकीय ग्रंथालयांमध्ये सुमारे ४८ लाख पुस्तके उपलब्ध असून त्यापैकी जवळपास ४२ लाख पुस्तकांची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये सात कोटींहून अधिक ग्रंथसंपदा असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रंथालयांसाठी विविध योजना राबविल्या जात असून अलीकडेच राज्यातील एक हजार ग्रंथालयांना पुस्तक संच देण्यात आले आहेत. तसेच २०० ग्रंथालयांना कपाटे व रॅक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावर्षी प्रथमच कारागृहातील ग्रंथालयांनाही पुस्तक संच देण्यात आले असून सात कारागृहांना त्याचा लाभ झाला आहे. ग्रंथपाल प्रमाणपत्र अभ्यासक्रमातही सुधारणा करून तो दोन महिन्यांवरून सहा महिन्यांचा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सभापती राजेंद्र डोखळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाचा प्रसार करून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखविल्याचे सांगत पुस्तकांमधूनच समाज घडत असल्याचे मत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांनी केले, तर आभार सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे यांनी मानले. सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले.

No comments:

Post a Comment