बक्तरपुर येथे श्रीदत्त यात्रोत्सव उत्साहात साजरा.



पत्रकार:- मोहन जाधव.

चास नळी :-                                                 

                  कोपरगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील श्रीदत्त मंदिराचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवाचे आयोजन समस्त बक्तरपुर ग्रामस्थ मंडळी,  यांच्या वतीने करण्यात आले होते. सोमवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी यात्रोत्सवाची सुरुवात झाली. सकाळी ६.०० वाजता श्रीदत्त मूर्तींचे मंगलस्नान करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता ध्वजारोहण व गीता पारायण पार पडले. सकाळी ९.०० वाजता गावकरी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४.३० वाजता भव्य मिरवणूक व शोभेची दारु चा कार्यक्रम झाला. रात्री ९.०० वाजता लोकनाट्य तमाशा झाला. मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ दुपारी ४.०० वाजता कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला. लोकनाट्य तमाशा, पारंपरिक कुस्ती स्पर्धा तसेच भव्य मिरवणूक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. 

मिरवणुकीदरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले होते, तर ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत मिरवणूक गावभर काढण्यात आली. कुस्ती स्पर्धेत पंचक्रोशीतील नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकनाट्य तमाशामुळे उपस्थित प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. या उत्सवात ग्रामस्थ, महिला, तरुण युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गावातील सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन हा उत्सव आनंदात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. या भव्य दिव्य यात्रा उत्सवामुळे बक्तरपूर गावात भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे सुंदर दर्शन घडले. यात्रेच्या निमित्ताने गावातील एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचेही उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सदर यात्रेसाठी पंच कमिटी, समस्त ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच पोलीस पाटील यांनी यात्रेसाठी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment