सभागृहात नारीशक्तीबाबत अवमानकारक वक्तव्य; आ. सतीश चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
गंगापूर | प्रतिनिधी. दैनिक. दर्पन प्रतिनिधी.पांडुरंग गायकवाड
महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षकांचे चार वेळा नेतृत्व केलेले आमदार सतीश चव्हाण आणि आमदार प्रशांत बंब यांच्यात नुकत्याच झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान नारीशक्तीबाबत अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप होत असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला असल्याची भावना व्यक्त होत असून संबंधित प्रकरणावरून निषेध व्यक्त केला जात आहे.
याबाबत गंगापूर तालुक्याच्या माजी सभापती ज्योतीताई गायकवाड (भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्या) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आमदार सतीश चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पत्राद्वारे निषेध नोंदवून सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ज्योतीताई गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे की, ज्या नारीशक्तीच्या विश्वासावर देशाची प्रगती आणि समाजव्यवस्था उभी आहे, त्या महिलांविषयी विधान परिषदेसारख्या प्रतिष्ठित सभागृहात अवमानकारक शब्दांचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, लोकप्रतिनिधींनी सभागृहात बोलताना संयम आणि जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून तात्काळ स्पष्टीकरण घेऊन त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.
या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून महिलांच्या सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता या मागणीवर शासन व सभागृह प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment