गुढीपाडव्यानंतर जिल्हा परिषदेत सत्तेची गुढी; अध्यक्ष-उपाध्यक्ष कोणाच्या वाट्याला?
✍🏻 प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड.दैनिक दर्पण वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागले आहे. गुढीपाडव्याचा सण संपल्यानंतर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू होण्याची शक्यता असून कोणता पक्ष आपल्या सत्तेची “गुढी” उभारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत एकूण 63 सदस्य असून सत्तेसाठी 32 सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने आता आघाडी आणि राजकीय गणित महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे.
राजकीय सूत्रांच्या मते, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहज गाठला जाऊ शकतो. असे समीकरण जुळल्यास अध्यक्ष पद भाजपकडे आणि उपाध्यक्ष पद शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आल्यास वेगळे राजकीय समीकरण तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत अध्यक्ष पद शिवसेना (उद्धव गट) किंवा काँग्रेसकडे जाऊन उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने सर्वच पक्षांकडून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुढीपाडव्यानंतर जिल्हा परिषदेत सत्तेची गुढी कोण उभारणार, अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment