आखाती युद्धाची झळ वाळुंजमध्ये; गॅससाठी ग्राहकांची ताटकळ, हॉटेल व्यवसाय अडचणीत



वाळुंज प्रतिनिधी – पांडुरंग गायकवाड

सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर उमटू लागले आहेत. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होत असल्याने त्याचा थेट परिणाम देशातील बाजारपेठांवर होत आहे. वाळुंज परिसरात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असून ग्राहकांना गॅस मिळवण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

वाळुंज परिसरातील विविध गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. घरगुती वापरासाठी तसेच लहान-मोठ्या उद्योगधंद्यांसाठी लागणारा गॅस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक कामगार कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळणे कठीण झाले असून काही ठिकाणी नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सीसमोर रांगेत उभे राहताना दिसत आहेत.

उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम

वाळुंज औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग राहतो. या भागातील खानावळी, छोटे हॉटेल, चहा टपऱ्या आणि खानावळ व्यवसाय गॅसवर अवलंबून आहेत. मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी तर गॅस उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येत आहे.

हॉटेल चालकांचे म्हणणे आहे की, “गॅस वेळेवर मिळाला नाही तर व्यवसाय चालवणे अशक्य होईल. आधीच महागाई वाढलेली आहे, त्यात गॅस तुटवडा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.”

पेट्रोलसाठीही रांगा

युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत असल्याने पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाळुंज परिसरातील काही पेट्रोल पंपांवरही नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

परदेशातील भारतीय नागरिकांची चिंता

या युद्धाचा पहिला आणि मोठा फटका आखाती देशांमध्ये कामासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांना बसला आहे. अनेक भारतीय कामगार तिथे अडकून पडले असल्याच्या बातम्या येत असून त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

सरकारची भूमिका महत्त्वाची

तज्ज्ञांच्या मते, जर युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले तर इंधन आणि गॅसच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पुरवठा व्यवस्थापन मजबूत करणे आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एकेकाळी सहज उपलब्ध असलेला गॅस आज दुर्मिळ

एकेकाळी सहज उपलब्ध असलेला घरगुती गॅस आज मिळवण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. परिस्थिती अशी झाली आहे की सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना गॅससाठी रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता युद्धाचे पडसाद केवळ सीमांवरच नाही तर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

No comments:

Post a Comment