क्रिकेट, सिनेमा, उत्सव आणि राजकारण: समाज कुठे चाललाय..?
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
क्रिकेट म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो उत्साहाचा महासागर! आयपीएल असो, आयसीसी विश्व कप असो की एखादा रोमांचकारी टी-ट्वेंटी सामना. स्टेडियम खचाखच भरतात, घराघरात मोठ्या स्क्रीनसमोर कुटुंबं जमतात, आणि सोशल मीडियावर भावनांचा अक्षरशः महापूर येतो. एखाद्या फलंदाजाच्या शतकासाठी आरत्या, नमाज पठण, पैजा इत्यादी. जिंकणाऱ्यांवर फुलांचा वर्षाव, हरल्यावर टीका आणि शिवीगाळ. क्रिकेट हा खेळ आहे की दोन देशांमधील युद्ध, असा प्रश्न पडावा इतकी तापलेली हवा निर्माण होते.
याच धर्तीवर आपल्या देशात सिनेमाचं वेडही तितकंच प्रखर. कोणाचा चित्रपट ‘सुपरहिट’ होणार, कोण ‘फ्लॉप’, कोट्यवधींच्या कमाईच्या चर्चांपासून हिरो-हिरोईनच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत सर्व गोष्टींना अफाट प्रसिद्धी मिळते. पोस्टर्स, डायलॉग्ज, गाणी, डान्स, टॅटू, हेअरस्टाईल, चाहत्यांचा अतिरेकी उत्साह कधी कधी अंधभक्तीत परिवर्तित होतो. कलाकार आणि क्रिकेटपटू म्हणजे जणू देवदूतच!
दरम्यान, आपल्या देशात विविध स्तरांवर निवडणुकांची सतत धामधूम सुरूच असते. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत. सभांमधील गर्दी, आश्वासनांचा वर्षाव, घोषणाबाजी, गुलाल, मिरवणुका, आणि निकालानंतरचा जल्लोष, राजकारणही एक प्रकारचं ‘इव्हेंट’ बनत चाललं आहे. नेत्यांच्या भाषणांमधील आक्रमक भाषा, पैशांचा अमाप वापर, आणि सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण अधिकच तापतं. राजकीय नेत्यांसाठी आपण आपापसात भांडत असतो.
यातच सण-उत्सवांची रंगतही वर्षभर अनुभवायला मिळते. गणेशोत्सव असो, ईद असो, दिवाळी, ख्रिसमस किंवा इतर कोणताही सण उत्सव आपल्या संस्कृतीचा आत्मा आहेत. सण हे आनंद, बंधुभाव, परस्पर स्नेह आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक आहेत. त्यांना विरोध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र सण साजरे करताना त्यांची पवित्रता, शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राहणे अत्यावश्यक आहे. ध्वनीप्रदूषण, दिखाऊ स्पर्धा, शक्तिप्रदर्शन, राजकीय रंग किंवा धार्मिक तेढ यामुळे सणांची मूळ भावना मलिन होऊ नये. उत्सव हा दिखाव्याचा नव्हे, तर संस्कारांचा आणि एकोप्याचा असावा. ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
पूर्वी टीव्ही हे केवळ करमणुकीचं साधन होतं; पण कालांतराने आशयहीन कार्यक्रम, भडक सामग्री यामुळे त्याबद्दलचा ओढा कमी झाला. त्यानंतर स्मार्टफोनच्या युगाने जग मुठीत आणलं. (कर लो दुनिया मुठ्ठी में) स्मार्टफोन मध्ये खरोखरच शिकण्यासारखं, जाणून घेण्यासारखं अपार काही उपलब्ध आहे; मात्र दिशाभूल करणारी, चंगळवादी आणि मन विचलित करणारी सामग्री तरुण पिढीला भरकटवते, ही वास्तवाची वेदनादायक बाजू आहे.
या सर्व गदारोळात हरवत चालली आहे ती वाचनसंस्कृती. ग्रंथालये, वाचनालये, व्यायामशाळा ओस पडताना दिसतात. अभ्यासापेक्षा ‘ट्रेंड’ महत्त्वाचा वाटू लागतो. विद्यार्थी तासन्तास सामने आणि सिनेमा चर्चांमध्ये गुंततात; पण पुस्तकांच्या सहवासातील शांत, सखोल आनंदापासून दूर जातात. उत्साह, मनोरंजन, खेळ, कला आणि सण-उत्सव यांना विरोध नाही; उलट ते जीवन समृद्ध करतात. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेकच विनाशाचे कारण ठरतो. आपल्याला हवे आहे संतुलन. क्रिकेटचा आनंदही घेऊ, सिनेमा पाहू, सण उत्साहात साजरे करू, लोकशाहीतील सहभाग नोंदवू; पण त्याचवेळी वाचन, व्यायाम, चिंतन, आत्मभान, समाजभान, आणि कुटुंबीयांशी संवाद यांना प्राधान्य देऊ.
आज गरज आहे ती ‘वेडे’ पणातून ‘विवेका’ कडे वाटचाल करण्याची. प्रसिद्धीच्या झगमगाटात हरवू न देता स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची उभारणी करण्याची. कारण शेवटी सामन्याचा निकाल, चित्रपटाची कमाई, सणांचा जल्लोष किंवा निवडणुकीचा निकाल क्षणिक असतो; पण ज्ञान, संस्कार, सामाजिक ऐक्य आणि सुदृढ विचार हीच खरी कायमस्वरूपी संपत्ती ठरते. वाचनसंस्कृती पुन्हा रुजवूया, युवकांना योग्य दिशेने प्रेरित करूया आणि उत्साहाला विवेकाची जोड देऊन समाजाचा खरा विकास घडवूया.
-- प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी

No comments:
Post a Comment