हृदयी अमृत, नयनी पाणी हीच स्त्रीजीवनाची खरी कहाणी...



८ मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिक शुभेच्छांचा किंवा उत्सवाचा नाही, तर स्त्रियांच्या संघर्षाचा, त्यांच्या समर्पणाचा, अथक परिश्रमांचा, जिद्दीचा आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत स्त्रीचे योगदान अमूल्य आहे. तिच्या सहनशीलतेला, संवेदनशीलतेला आणि धैर्याला सलाम करण्याची हीच खरी वेळ आहे.

आजच्या आधुनिक युगात स्त्रीने शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, प्रशासन, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तरीही वास्तव पाहिले तर घरात आणि समाजात मुलगा-मुलगी समानतेची वागणूक सर्वत्र दिली जाते असे ठामपणे म्हणता येत नाही. स्त्रीकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यामागील विकृत मानसिकता बदलणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.

इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर स्त्रीजीवनाला अनेक अमानुष प्रथांचा सामना करावा लागला आहे. बालविवाह, सतीप्रथा, विधवा केशवपन, विधवा विवाहबंदी, हुंडा प्रथा, गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक अन्यायकारक रूढींनी स्त्रीच्या आयुष्याला वेदनांनी ग्रासले होते. स्वातंत्र्यानंतर या प्रथांविरोधात कठोर कायदे करण्यात आले आणि समाजसुधारकांनी जनजागृती केली. त्यामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला असला तरी लिंगभेदाची छाया पूर्णपणे नाहीशी झाली आहे असे म्हणता येत नाही.

स्त्री सक्षमीकरणाची चर्चा आज सर्वत्र ऐकू येते, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात समानतेचा दृष्टिकोन अजूनही सर्व स्तरांवर दृढ झालेला दिसत नाही. स्त्रीला खऱ्या अर्थाने सन्मान मिळवून देण्यासाठी केवळ कायदे किंवा घोषणा पुरेशा नाहीत; समाजाची मानसिकता बदलणे अधिक आवश्यक आहे. महिला सबलीकरणासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

याचबरोबर एक महत्त्वाचा विचार स्त्रियांनीही मनापासून स्वीकारला पाहिजे. स्त्रीने स्त्रीला समजून घेतले पाहिजे. अनेकदा स्त्रीच स्त्रीची शत्रू ठरते, असे वास्तव समाजात दिसून येते.  परस्परांविषयी आदर, समजूतदारपणा आणि सहकार्याची भावना वाढवली तर समाजातील अनेक विसंगती आपोआप दूर होतील.

आपण प्रत्येक नात्यात स्त्रीचा विचार केला तर तिचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. जिच्या उदरातून आपण जन्म घेतो, जिच्या पंखाखाली वाढतो ती आई, जिवापाड प्रेम करणारी बहीण, आयुष्यभर सुख-दुःखात खंबीर साथ देणारी पत्नी आणि समाजातील प्रत्येक स्त्री या सर्वांविषयी आदरभाव असणे हीच खरी संस्कृती आहे. परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. प्रख्यात कवी ग. दि. माडगूळकर यांनी स्त्रीजीवनाचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन करताना लिहिले आहे की, 

“स्त्री जन्मा ही तुझी कहाणी,
हृदयी अमृत, नयनी पाणी.”

या ओळी स्त्रीच्या संवेदनशीलतेचे आणि सामर्थ्याचे सुंदर चित्र उभे करतात. म्हणूनच स्त्रीला केवळ अबला म्हणून पाहणे ही मोठी चूक आहे. आज ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहे.

जागतिक महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस न राहता आत्मपरीक्षणाचा दिवस ठरला पाहिजे. स्त्रियांना समान संधी, सन्मान आणि सुरक्षितता देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. तसेच स्त्रियांनीही स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकमेकींचा आदर आणि पाठिंबा वाढवणे आवश्यक आहे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, 

“तुझ्या उंच भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,

तुझ्या विशाल पंखाखाली विश्व विसावे.”


स्त्रीचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आयुष्यभराच्या संस्कारांचा भाग झाला, तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत आणि सुसंस्कृत बनेल.

-- प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी (महाड - रायगड)

No comments:

Post a Comment