३१ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण; तळेगावचे सुपुत्र शिक्षक विनोद जाधव यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

३१ वर्षे ज्ञानदानासोबत गरजू विद्यार्थ्यांना आधार देणारे शिक्षक श्री. विनोद काशिनाथ जाधव.


सोयगाव प्रतिनिधी : दिलीप मोरे


"विद्यार्थी हेच दैवत" मानून तब्बल ३१ वर्षे अध्यापनाची अखंड सेवा करणारे छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावळदबारा येथील शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. विनोद काशिनाथ जाधव हे दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त मंगळवार, ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील सुपुत्र असलेल्या जाधव सरांनी सावळदबारा येथे ३१ वर्षे प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. विषयातील प्रभुत्व, शिस्तप्रिय स्वभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक ठरले. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

सन १९९५ पासून सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जाधव सरांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार व वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यांनी वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करत त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

उच्चशिक्षित असलेल्या जाधव सरांनी मराठी विषयात SET व PET परीक्षा उत्तीर्ण करून एम.एड. ही उच्च पदवी संपादन केली आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच ते कवी, साहित्यिक, पत्रकार आणि समाजसेवक म्हणूनही परिचित आहेत. त्यांचा "फोकी" काव्यसंग्रह, "महर्षी वाल्मिकी" खंडकाव्य तसेच "शून्यातून संघर्षाची कहाणी" हे आत्मकथन लवकरच प्रकाशित होत आहे. विविध साहित्यिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

ते शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे समाजात, पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये त्यांना विशेष मान मिळाला आहे.

या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन शिक्षक भारती परिवार, आदिवासी कोळी महासंघ व स्नेही मित्र परिवार यांच्या सहकार्याने आदिवासी कोळी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, जामनेर येथे सकाळी १० वाजता करण्यात आले असून सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी इंजि. तिर्थेश जाधव, डॉ. मिनल जाधव, कु. तिक्षा जाधव व समस्त जाधव परिवार यांनी विनीत निमंत्रण दिले असून शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



No comments:

Post a Comment