पळसखेड्यातील सिमेंट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट साहित्य वापरल्याचा शेतकऱ्यांचा दावा
![]() |
| पळसखेडा (ता. सोयगाव) येथील गट क्रमांक ३९ मधील सिमेंट बांधाच्या निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त करताना शेतकरी. |
सोयगाव प्रतिनिधी...दिलीप मोरे...
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील गट क्रमांक ३९ मध्ये सुरू असलेल्या सिमेंट बांधाच्या कामावर स्थानिक शेतकऱ्यांनी गंभीर आरोप करत बांधकामातील कथित गैरप्रकार उघड केला आहे. कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून काम पूर्ण होण्यापूर्वीच मार्च एंडचा फायदा घेत बिल काढण्याची घाई ठेकेदार व संबंधित यंत्रणेकडून सुरू असल्याचा आरोप शेतकरी अहमद गुलाब तडवी आणि जब्बार निजाम तडवी यांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, सिमेंट बांधासाठी आवश्यक असलेला मजबूत पाया न घेता केवळ दोन फूटच खोदकाम करून त्यात माती, दगड आणि कचरा टाकून बांधकाम उरकले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या बांधाची मजबुती आणि टिकावधारणा याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व चिंता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावलेला नसून कामाचा खर्च, योजना, ठेकेदाराचे नाव किंवा तांत्रिक तपशील याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम पारदर्शकतेपासून दूर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.काही ठिकाणी सिमेंटमध्ये माती मिश्रित दगडांचा वापर करण्यात आल्याचे तसेच लोखंडी स्टीलचा योग्य वापर न झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी बांधकामाचा दर्जा अत्यंत खालावलेला दिसत असून भविष्यात हा सिमेंट बांध पावसाळ्यात टिकेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पळसखेडा हे दुर्गम व आदिवासी बहुल गाव असल्याने याचाच गैरफायदा घेत ठेकेदार व संबंधित अभियंते मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. गावातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, दोषी ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी अहमद गुलाब तडवी आणि जब्बार निजाम तडवी यांनी केली आहे.
जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर सरकारी निधीचा अपव्यय आणि बांधकामातील मोठा गैरप्रकार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment