सावळदबारा शिवारातील आगीची विशेष पाहणी; शेतकऱ्याला लवकर मदतीचे आश्वासन




सोयगाव प्रतिनिधी... दिलीप मोरे...

तालुक्यातील सावळदबारा शिवारातील गट क्रमांक १०८ येथे दिनांक २१ मार्च २०२६ रोजी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी दिनकर आबाराव मोरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर अखेर दि.३०रोजी दुपारी सुमारे १२ वाजेच्या दरम्यान विद्युत वितरण विभागाच्या विशेष अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी लोंबत्या विद्युत तारा, वाकलेले पोल तसेच जळालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी सदर नुकसान हे शॉर्टसर्किटमुळेच झाल्याचे प्राथमिक निरीक्षण वरिष्ठ पाहणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, अशी माहिती मिळाली. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली.

यावेळी उपस्थित ॲडिशनल ए.ई. घुले साहेब व सावळदबाराचे वायरमन घोडके यांना अधिकाऱ्यांनी विचारणा करत, शेतकऱ्यांनी चार महिन्यांपूर्वीच लोंबत्या तारांबाबत सूचना दिल्या असताना दुरुस्ती का करण्यात आली नाही, असा जाब विचारला. तसेच लोंबत्या तारांमुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला आठ दिवसांच्या आत विद्युत तारा व्यवस्थित करण्याचे आदेश दिले. आवश्यक असल्यास नवीन पोल उभारण्यात यावा, तसेच भविष्यात शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. उन्हाळ्यात उष्णतेबरोबरच तारांवर पक्ष्यांचा समूह बसल्यानेही शॉर्टसर्किट होऊ शकते, त्यामुळे धोकादायक स्थिती टाळण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी शेतकरी दिनकर मोरे यांनी तलाठी पंचनामा, फरदापूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार, नुकसानीचे छायाचित्रे तसेच संबंधित अर्ज अधिकाऱ्यांकडे सादर केला. सदर कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन ॲडिशनल ए.ई. घुले साहेब यांनी दिले.

दरम्यान, शेजारील गट क्रमांक १०६ मधील शेतकरी गजानन आप्पा कुल्ले यांनी घटनेच्या वेळी ठिणग्या पडून आग लागल्याचे पाहिल्याची माहिती यापूर्वी दिली होती. आजच्या पाहणीतही विद्युत तारांची धोकादायक स्थिती स्पष्ट झाल्याने शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

या पाहणीनंतर शेतकरी दिनकर मोरे यांना लवकर मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.




No comments:

Post a Comment