महागाव तालुक्यातील दगडथर येथे अस्वलाचा थरारक हल्ला शेतकरी गंभीर जखमी
प्रतिनिधी महागाव अक्षय डोंगरे
महागाव तालुक्यातील दगडथर परिसरात रविवारी पहाटे घडलेल्या अस्वलाच्या हल्ल्याच्या घटनेने ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीच्या कामासाठी निघालेल्या एका शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक झडप घालत भीषण हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या चेहऱ्याचे लचके तोडण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी वर्गात तीव्र अस्वस्थता व्यक्त होत आहे.
उत्तम मारोती खराटे (वय ४४, रा. दगडथर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. उत्तम खराटे हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास आपल्या शेतीच्या कामासाठी घरातून बाहेर पडले होते. दगडथर ते निंगणूर मार्गावरील हनुमान मंदिराजवळील परिसरात ते पोहोचताच झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे खराटे यांना बचावाची संधीही मिळाली नाही.
अस्वलाने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जबरदस्त झडप घालत गंभीर जखमा केल्या. प्रसंगावधान राखत उत्तम खराटे यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून आसपासच्या शेतात कामासाठी जाणारे व गावातील काही नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. गावकऱ्यांची चाहूल लागताच अस्वलाने जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र तोपर्यंत खराटे हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत कोसळले होते.
ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना उचलून प्राथमिक उपचारांची व्यवस्था केली व पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची वार्ता गावात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पहाटे व सायंकाळच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डी. के. मुनेश्वर (वनपरिक्षेत्र अधिकारी, महागाव), ए. एस. चहाणकर (क्षेत्र सहायक) तसेच एल. डी. जाधव (वनरक्षक, चिल्ली) यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. परिसरात अस्वलाच्या हालचालींचे चिन्हे आढळून आली असून पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, ग्रामीण भागात वन्यप्राण्यांची वाढती वर्दळ ही चिंतेची बाब ठरत आहे. जंगलालगत असलेल्या शेतजमिनींमध्ये पिकांच्या हंगामात व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे वळत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी वर्गाला जीव मुठीत धरून शेती करावी लागत आहे. दगडथर परिसरात यापूर्वीही वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाने या परिसरात तातडीने गस्त वाढवावी, पिंजरा लावून संबंधित अस्वलाचा बंदोबस्त करावा तसेच जखमी शेतकऱ्यास त्वरित शासकीय मदत व नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे संरक्षण ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
अस्वलाच्या या हल्ल्याने फुलसावंगी व दगडथर परिसर हादरला असून, वनविभागाने तातडीची व ठोस कारवाई करून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment