शृंगॠषी महाराज संस्थानच्या सौंदर्यीकरणासाठी पाच कोटीचा निधी देणार—आ.श्याम खोडे
शृंगॠषी तिर्थक्षेत्राला "ब" वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नरत
अनसिंग ;-(ता.१९ ):- पौराणिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या अनसिंग येथील शृंगॠषी संस्थानच्या सौंदर्यीकरणासह विविध विकास कामासाठी शासनाकडून पाच कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार श्याम खोडे यांनी मंगळवारी येथे दिली.
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी जो पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता,त्या यज्ञाचे संयोजक अनसिंग येथील श्री शृंगॠषी महाराज होते.अशी अख्यायिका आहे.याचा पुराणातही उल्लेख आहे.अनसिंग येथील शृंगॠषी महाराज मंदिर देशभरात प्रसिद्ध असून दरवर्षी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला महाराजांच्या दर्शनासाठी विविध प्रांतातून व पंचक्रोशीतून हजारो भाविक येत असतात.
मंगळवार ( ता.१८ ) रोजी महाशिवरात्री सोहळ्याच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास वाशीमचे आमदार श्याम खोडे अनसिंग येथील श्री शृंगॠषी महाराज संस्थानमध्ये आले होते.त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले,शृंगॠषी महाराज मंदिर परिसरातील दोन एकर जागेमध्ये पेव्हर ब्लाॅक बसविणे,मंदिराच्या बाजुला असलेल्या नाल्यावर अत्याधुनिक स्वच्छता गृह बांधणे,नाल्याचे सौंदर्यीकरण,परिसराचे सौंदर्यीकरण,भक्तांसाठी डोम शेड,महाप्रसादासाठी भव्य शेड,आधुनिक स्वयंपाक घर, सिमेंट काँक्रीटचे रस्ते,रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे,शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ईतर आवश्यक कामासाठी आपण शासनाकडून पाच कोटी रूपयाचा निधी मंजूर करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.तसेच श्री शृंगॠषी महाराज मंदिर संस्थानला "ब" वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे सांगितले.यावेळी संस्थानचे अध्यक्ष अशोक सारडा, सत्यनारायण सारडा,विश्वस्त अण्णासाहेब राजे,माधव ठाकरे, सारंग सारडा,बबलु बजाज,लक्ष्मण पाबळे,वाशीम बाजार समितीचे संचालक नत्थुजी कापसे,भाजप कार्यकर्ते राजू मानधणे,चंद्रकांत ठाकरे यांचेसह शेकडो भाविक,भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.शृंगॠषी संस्थानच्या वतीने आमदार खोडे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.आमदार खोडे यांनी महाप्रसादाच्या पंगतीमध्ये भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून आपली सर्वसामान्य लोकांसोबत बांधिलकी असल्याचे दर्शविले.

No comments:
Post a Comment