नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे काळाची गरज--- कुलसचिव डॉ. सावर्डेकर



संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

महाड: कोकणातील जैवविविधता जपल्यास शाश्वत शेतीसाठी खूप मोठा फायदा होतो, कारण नैसर्गिक विविधता मातीची सुपीकता, परागीभवन आणि कीड नियंत्रणास मदत करते, तसेच पारंपरिक ज्ञानावर आधारित शेती पद्धती, मिश्र पीक पद्धती, वनशेती रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टाळून निसर्ग-अनुकूल शेतीला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे कोकणाची शेती अधिक समृद्ध आणि टिकाऊ होवून त्याचा शाश्वत शेतीसाठी नक्कीच उपयोग होईल असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी महाड येथे आयोजित कृषीधन : विज्ञान - हवामान - तंत्रज्ञान प्रदर्शन 2026 चे उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. 

महाड येथील श्री विरेश्वर देवस्थान परिसरात दि. ३० व ३१ जानेवारी  रोजी “कृषिधन : कृषी विज्ञान - हवामान -तंत्रज्ञान प्रदर्शन २०२६” या महत्त्वपूर्ण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. कृषी, विज्ञान, हवामान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारे हे प्रदर्शन शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व कृषी उद्योग क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरले आहे. या प्रदर्शनात कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विज्ञान शिक्षक, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्योग प्रतिनिधी एकत्र आले, नवीन कृषी तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती, हवामान बदलाचे शेतीवरील परिणाम, कृषी उद्योगातील बदलत्या संधी, तसेच कृषी विकासात हवामान अंदाजाचे महत्त्व या विषयांवर परिसंवाद व सखोल चर्चा झाली.

    यासोबतच महाडमध्ये उपलब्ध कृषी संलग्न अभ्यासक्रम, उच्च शिक्षण व करिअर संधी यावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे विज्ञानाधिष्ठित मॉडेल्स आकर्षणाचे केंद्र ठरले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, अ‍ॅग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी व फूड टेक्नॉलॉजी, महाड येथील विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवरील मॉडेल्स सादर करण्यात आले. यामध्ये कृषी पर्यटन, मातीविना शेती, उभी शेती, सेंद्रिय शेती, एकात्म शेती पद्धती, सौर ऊर्जा सिंचन, हरितगृह, पर्जन्यजल साठवण, कंपोस्ट व गांडूळ खत, अन्न कचरा व्यवस्थापन, अन्न पॅकेजिंग, द्राक्ष वाईन उत्पादन, मानवी व वनस्पती पेशी, न्यूरॉन, क्लोरोप्लास्ट, कोरोना विषाणू, आरोग्य व स्वच्छता आदी विषयांचा समावेश होता. महाडकर नागरिक आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शन ला भेट देवून युवा वैज्ञानिकांचे कौतुक केले.

विद्यार्थी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात डॉ. विद्याधर वैद्य (कृषी हवामान शास्त्र विभाग, आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात) यांनी उपस्थित राहून कृषी संलग्न अभ्यासक्रम च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कृषी शिक्षणामध्ये तीन बाबी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे Education-Reserch आणि Extension त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचलित शिक्षणापेक्षा व्यावसायिक आणि संशोधक घडविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या कृषी संलग्न अभ्यासक्रमाकडे वळावे. विद्यार्थ्यानो शिक्षण हे नोकरीसाठी नसून संशोधन वृत्ती वाढण्यासाठी असावे. शिक्षण घेवून शेतकऱ्यांचा एक प्रश्न जरी आपण सोडवू शकलो तरी स्वतःला धन्य समजावे. प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य हे कृषी शिक्षणामध्ये आहे. असे ते म्हणाले. कृषी विकासात हवामान अंदाजाचे महत्व या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. 

यावेळी विज्ञान भारती चे कोकण प्रांत प्रमुख डॉ. रविकांत आळतेकर, विनय नाईक यांची सुद्धा उपस्थिती होती. तसेच अनुभवकुशल औद्योगिक व्यवस्थापक व समाजाभीमुख रोटेरिअन सुरेश भोसले यांनी कृषी उद्योग आणि काळानुरूप बदलत्या संधी या परिसंवादाद्वारे उपस्थिता सोबत संवाद साधतांना कृषी उत्पादन - ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग स्ट्रेटीजी यासंदर्भाने अतिशय उपयुक्त माहिती दिली. यावेळी परिसंवाद मध्ये रोटेरिअन प्रदीप शेट, कृष्णाई काजू प्रक्रिया उद्योग चे विलास पवार, पाटेकर सोलकढी च्या विजया पाटेकर, वि. गो. चिमणकर, संवादक प्रा. माया देसाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रदर्शनीचे  उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे कुलसचिव डॉ.संतोष सावर्डेकर यांच्या सह  तहसीलदार महेश शितोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर, गट शिक्षणाधिकारी राजन सुर्वे, नगरसेवक प्रमोद महाडिक, भारतीय किसान संघ चे जिल्हाध्यक्ष प्रमोद लांगी, श्री विरेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष दिपक वारंगे, रायगड शैक्षणिक संकुल चे कार्यकारी अधिकारी उद्धव कोकाटे, जे. आर. मोरे, प्रा. अपूर्वा देसाई सुधीर जानराव, विनोद पैठने,प्रा सविता यादव, प्रा. आयेशा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

फार्म फ्रेश विक्री व विशेष उपक्रम

 प्रदर्शनादरम्यान कृषी महाविद्यालय फार्ममधील ताजा भाजीपाला, कंपोस्ट खत, पशुखाद्य विक्रीसाठी उपलब्ध होते. दरम्यान महाडकरांनी प्रदर्शन ला भेट देवून फ़ार्म फ्रेश भाजी खरेदी चा आनंद घेतला.  यावेळी “फार्म फ्रेश व्हेजी बॅग” चे लोकार्पण करण्यात आले, ही भाजीपाला बॅग दर आठवड्याला महाडकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सर्वांसाठी उपयुक्त उपक्रम

प्रदर्शनीच्या परिसरास “डॉ. बाळासाहेब सावंत विज्ञान नगरी” असे नाव देण्यात आले होते.शालेय शिक्षण अधिक अनुभवाधिष्ठित व्हावे, अन्न उत्पादन, पर्यावरणशास्त्र, जैवविविधता व संवर्धन यांचे महत्त्व प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी कृषिधन : कृषी विज्ञान - हवामान - तंत्रज्ञान प्रदर्शन 2026 निश्चितच उपयुक्त ठरली असल्याने प्रदर्शनीमध्ये आनंदी वातावरण दिसून येत होते. 

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विज्ञान शिक्षक, शेतकरी गट, बचत गट, कृषी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, एफपीओ संचालक व जागरूक नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देवून समाधान व्यक्त केले.


No comments:

Post a Comment